धारूर : मानवलोक संस्थेच्या वतीने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी व सामान्य शेतकरी सेंद्रिय शेतीकडे प्रोत्साहित व्हावा, याकरिता मानवलोकचा सेंद्रिय शेती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत सेंद्रिय सोयाबीन व कापूस दिन साजरा करण्यात आला. सेंद्रिय शेती करण्यासाठी मानवलोक शेतकऱ्यांना मार्गदर्शन व मदत करीत आहे. कोळपिंपरी येथील सेंद्रिय शेती करणारे सुरेश सोळंके यांच्या सेंद्रिय सोयाबीन पिकांमध्ये व हासनाबाद येथील राहुल नखाते यांच्या सेंद्रिय कापूस पिकांमध्ये अंबाजोगाई, परळी, केज, धारूर या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्रक्षेत्र आयोजित केली होती. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या सोयाबीन व कापूस पिकांची निरीक्षणे दाखवण्यात आली. मानवलोकमार्फत देण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करीत कामगंध सापळे, सापळा पिके, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, चिकट सापळे इत्यादी यांचा अवलंब केल्यामुळे सेंद्रिय सोयाबीन पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणात दिसून आला. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे सेंद्रिय शेती शक्य आहे, असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले. सेंद्रिय शेती करण्यासाठीच्या अडचणी व शेतकऱ्यांच्या मनात असणाऱ्या समस्या ओळखून सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मानवलोक सेंद्रिय शेती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई उपविभागीय कृषी अधिकारी एस. डी. शिनगारे, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी, अंबाजोगाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. जायवार नरेशकुमार, अंबाजोगाई कृषी सहायक पंडित काकडे, मानवलोकचे लालासाहेब आगळे, अण्णा रोहम यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
... ५ हजार हेक्टरचे उद्दिष्ट
सेंद्रिय शेतीला बदलत्या हवामानास पूरक व जगभरातील ग्राहकांकडून प्रचंड मागणी आहे. शेतीमधील खर्चाचे प्रमाण पाहता शेती परवडत नाही, यामुळे कमी खर्चाची शेती म्हणून सेंद्रिय शेतीला ओळखले जाते. मानवलोकच्या पुढाकाराने अंबाजोगाई, धारूर, केज व परळी या भागातील ४५० एकरवर सेंद्रिय शेती शेतकरी करतात. त्यांना मार्गदर्शन व सहकार्य मानवलोक करीत आहे. पुढील तीन वर्षांत ५ हजार हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्यासाठी मानवलोक प्रयत्नशील आहे.