मराठा आरक्षणाविरोधात अजित पवारांनीच छगन भुजबळांना पुढं केलंय; मनोज जरांगेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 06:36 PM2024-01-07T18:36:15+5:302024-01-07T18:38:10+5:30
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.
Ajit Pawar ( Marathi News ) : बीड- राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आरक्षणासाठी वेळ दिला होता, आता पुन्हा सरकारने वेळ वाढवून घेतला आहे. दरम्यान, आता २० जानेवारी रोजी मुंबईत मोठं आंदोलन होणार आहे. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारछगन भुजबळ यांना मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलण्यासाठी पुढं केलंय असा आरोप केला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा आक्षणाच्या विरोधातच त्यांनी आधीपासून काम केले आहे. तुमच्या पक्षातील माणूसच मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत होता. तुम्हीच त्यांना आधीपासून पाठिंबा देत होता का? आताच्या तुमच्या बोलण्यावरुन हेच लक्षात येत आहे. तुम्हीच त्या व्यक्तीला मराठ्यांच्या विरोधात पुढं केलंत हेच लक्षात येत, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांवर केला.
"या आधी तुम्ही मराठा आरक्षणावरुन एक शब्दही बोलत नव्हता. शांत होता, याचा अर्थ असा होता तुम्हीच भुजबळ यांना पुढं घालून बोलायला लावत होता, तुमच्याचमुळे राज्यातील गुन्हे झाले आहेत. आता थोड्याच दिवसात सगळं उघड पडेल. असं झालं तर तुमच्या राजकीय करिअरचा मराठेच सुपडा साफ करु शकतात, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
अजित पवारांचा जरांगेंना इशारा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून राज्यात मोर्चे सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांनीही आता राज्य सरकारला इशारा दिला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आता मुंबईत मोर्चा निघणार आहे. २० जानेवारी रोजी अंतरवली सराटी येथून मराठा समाज मुंबईसाठी निघणार आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रीया देत जरांगे पाटील यांना इशारा दिला. 'मराठा आरक्षणासाठी काही लोक टोकाची भाषा वापरत आहेत. मुंबईला येण्याबाबत घोषणा करत आहेत. संविधानावर देश चालत आहे, जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचा मुलाहिजा ठेवायचा नाही. कायद्यापेक्षी कुणीही श्रेष्ठ नाही, हे देखील लक्षात ठेवा, असा इशारा अजित पवार यांनी जरांगे पाटील यांना दिला.
दरम्यान, आता या इशाऱ्याला मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जरांगे पाटील यांनी एकेरी उल्लेख करत अजित पवारांवर टीका केली. "शेवटी त्यांनी आता पोटातले ओठात आणलेच, पहिल्यापासून तुम्ही मराठ्यांच्या विरोधातच काम केले आहे. दहा पाच जणांना जवळ करुन बाकी करोडो मराठ्यांचे वाटोळे केले, शांततेत येणाऱ्यांवर कारवाई करुन दाखवावी, मग मराठेही शांततेत उत्तर देतील, असंही जरांगे पाटील म्हणाले.