बीड : मराठा आरक्षणाची मागणी अद्यापही सरकारने पूर्ण केली नाही, तसेच दिलेली मुदतही रविवारी संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये शनिवारी मनोज जरांगे पाटील यांची निर्णायक इशारा सभा होत आहे. यात ते काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सभेच्या आधी सकाळी बीड शहरातून रॅली निघाली आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरूवात झाली. ही रॅली सुभाष रोड, साठे चौक, जालना रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बार्शी रोड, बार्शी नाका मार्गे सभास्थळी दुपारी २ वाजता पोहचणार आहे. दरम्यान, रॅलीला सुरूवात झाल्यानंतर जरांगे पाटील यांचे ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीवर मनाेज जरांगे पाटील ठाम आहेत. सरकारला दिलेली मुदतही २४ डिसेंबरला संपत आहे. त्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी २३ डिसेंबरला जरांगे-पाटील यांची बीडमध्ये निर्णायक इशारा सभा आयोजित केली आहे. बीड शहरापासून जवळच असलेल्या सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती संभाजी महाराज चौकात दुपारी दोन वाजता ही सभा होणार आहे.
५० एकरमध्ये सभा, ५० एकर पार्किंगही सभा जवळपास ५० एकरमध्ये होणार आहे, तसेच वाहन पार्किंगसाठीही चार ठिकाणी ५० एकर जागेचे नियोजन केले आहे. छत्रपती संभाजीनगरकडून बायपास मार्गे आलेल्यांसाठी बायपास लगत असलेल्या शेतकरी ढाबा समोर, बीड शहरातील मार्गाने आलेल्यांसाठी वायसीआयपी कॉलेजसमोरील व पाठीमागील मैदान, मांजरसुंबामार्गे आलेल्यांसाठी खजाना बावडीजवळ पार्किंग व्यवस्था असेल. हे सर्व अंतर अर्धा ते एक किमी अंतरावर आहेत.
आरोग्याची अशी व्यवस्थाआरोग्याच्या अनुषंगाने आयोजकांनी १० रुग्णवाहिकांचे नियोजन केले आहे. सोबतच सभेच्या समोरील बाजूस असलेल्या एका इमारतील अत्यावश्यक सर्व सेवा दिल्या जाणार आहेत. येथे विशेष तज्ज्ञांची टीम असणार आहे.
असा असेल रॅलीचा मार्गडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅली सुभाष रोडमार्गे अण्णाभाऊ साठे चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकात येईल. यावेळी महापुरुषांना अभिवादन केले जाईल. तेथून बार्शी रोड, बार्शी नाका येथे पोहोचले. येथे मुस्लीम समाजबांधवांकडून स्वागत होईल. तेथून ही रॅली सभास्थळी पोहोचेल. दरम्यानच्या काळात विविध समाजाकडून जरांगे पाटलांचे स्वागत केले जाणार आहे.
२०१ जेसीबीतून पुष्पवृष्टीरॅली ते सभास्थळ यादरम्यान जरांगे पाटलांचे ठिकठिकाणी विविध समाजबांधवांकडून स्वागत तर होणारच आहे; परंतु याच मार्गावर २०१ जेसीबीतून त्यांच्यावर पुष्पवृष्टी होणार आहे.
१० टन साबूदाना, ३० टन तांदूळ खिचडीया सभेसाठी आलेल्या लोकांची गैरसोय होणार नाही, यासाठी १ लाख पाणी बाटल्यांची व्यवस्था केली आहे. शिवाय दाेन ट्रक केळी, १० टन साबूदाना आणि ३० टन तांदळाची खिचडी तयार केली जाणार आहे. सर्व समाजातील लाेकांनी यासाठी योगदान दिले आहे.
महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्थासभेत दक्षिण बाजूला महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये तरुणी, युवती स्वयंसेवक म्हणून काम करतील. या सभेसाठी जवळपास १ हजार स्वयंसेवक असणार असून त्यांच्यासाठी वेगवेगळा ड्रेस कोड राहणार आहे.
४ स्क्रीन अन् लाइटची व्यवस्थाया सभेला होणारी गर्दी पाहता चार ठिकाणी मोठ्या स्क्रीन बसविल्या आहेत. सोबतच भोंगे, साउंडही असतील.