केज (बीड) : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अंबाजोगाई रस्त्यावर कानडी चौकात टायर पेटवून दिल्याची घटना वगळता बंद शांततेत होता.
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे या युवकाने जलसमाधी घेतल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर केज शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने केज बंद पुकारण्यात आला. आज सकाळी शहरात मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकात काकासाहेब शिंदे यांना सकल मराठा समाजाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सकल मराठा समाजाच्या वतीने केज शहरासह युसूफवडगाव, आडस , बनसारोळा , मस्साजोगसह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी शहर व तालुक्यातील शाळा, महाविद्यालयास सुटी देण्यात आली. आजच्या आठवडी बाजारावर बंदचा परिणाम जाणवला.