बीड : मराठा आरक्षणासाठी २१ दिवसांपासून परळीमध्ये सुरु असलेले ठिय्या आंदोलन मंगळवारी स्थगित करण्यात आले. मात्र, बुधवारी जिल्ह्यातील विविध ठिकाणी आरक्षणाची मागणी करीत आंदोलने करण्यात आली. यामध्ये केज, माजलगाव, गेवराई, जहांगीरमोहा येथील आंदोलनाचा समावेश आहे. सायंकाळी केजमध्ये आंदोलन मागे घेण्यात आले. ३० नोव्हेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास १ डिसेंबरपासून पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
केजमध्ये सहाव्या दिवशीही भजन, ठिय्याकेज तहसील कार्यालयासमोर सहा दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू होते. बुधवारी सायंकाळी ५ वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. मराठा समाजाला येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत आरक्षण जाहीर न केल्यास १ डिसेंबर पासून पुन्हा आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी तहसीलदार अविनाश कांबळे, मराठा आरक्षण समितीचे समन्वयक विनोद शिंदे , अमर पाटील , हनुमंत भोसले, मुकूंद कणसे, रामचंद्र गुंड , संदीप पाटील अंकुश इंगळे , राहुल सोनवणे , दिलीप गुळभिले , विलास जोगदंड, मोहन गुंड, पशूपतीनाथ दांगटसह तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते. दिवसभरात महिलांनी भजन करत ठिय्या आंदोलन केले. पिंपळगाव येथील समाजबांधवांनी सहभाग घेतला. आंंदोलनास केज तालुका रिपाइं, पत्रकार संघ, एकल महिला संघाने पाठिंबा जाहीर केला.
आरक्षणासाठी मुलांना शाळेत न पाठविण्याचा राजेगावात निर्धारमाजलगाव : तालुक्यातील राजेवाडी येथील मुस्लिम व मराठा समाजाने एकत्र येत जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत येथील या दोन्ही समाजाचा एकही विद्यार्थी शाळेत जाणार नाही असा पावित्रा घेतला आहे.राजेवाडी येथील जि. प. शाळेत इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत एकूण १९० विद्यार्थी असून यात मराठा समाजाचे जवळपास १०० विद्यार्थी आहेत. तर मुस्लिम समाजाचे २५ ते ३० विद्यार्थी आहेत.बुधवारी येथील संबंधित पालकांनी याबाबतचे निवेदन मुख्याध्यापकांकडे दिले. त्यामुळे बुधवारी शाळेत केवळ ४० विद्यार्थी उपस्थित होते.
जहांगीरमोहा येथे दोन तास रास्ता रोकोधारुर : तालुक्यातील जहांगिर मोहा येथे बुधवारी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी तहसीलदार राजाभाऊ कदम यांना मराठा ठोक मोर्चाच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी एक मराठा,लाख मराठा आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.या आंदोलनाला परिसरातील गावकऱ्यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.