बीड : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकले नाही. आता राज्य सरकारने न्यायालयात मराठा समाजाची व्यवस्थित बाजू मांडून मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळवून द्यावे, अशी मागणी आ. सुरेश धस यांनी केली. या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी आ. धस यांच्या नेतृत्वात २८ जून रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
यावेळी गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार, मा. आ. आर. टी देशमुख, सी. ए. बीबी जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी व मराठा समाजातील हजारो नागरिकांनी या मोर्चात सहभाग घेतला होता. ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत पेठ बीड भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाची सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा आला. यावेळी बोलताना सुरेश धस यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
कोरोना सगळीकडे आहे, फक्त कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोलेंच्या कार्यक्रमाला, राष्ट्रवादीच्या व शिवसेनेच्या कार्यक्रमांना कोरोना नसतो. राष्ट्रवादीची परिसंवाद यात्रा सुरू आहे, कुठल्या परी सोबत त्यांचा संवाद सुरु आहे हे माहीत नाही. त्याठिकाणी कोरोना नाही, परंतु अधिवेशनाला कोरोना आहे. केवळ दोन दिवसांचे अधिवेशन किमान आठवडाभराचे तरी अधिवेशन असावं मात्र, या आघाडी सरकारला सर्वसामान्यांचे म्हणणे ऐकूण घ्यायचे नाही. त्यामुळे ही चाल केलेली आहे. ज्या फडणवीसांची जात काढता, त्यांना साडेतीन टक्क्यांचे म्हणता, त्याच फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण दिले. त्यांच्या पत्नी बद्दल अपशब्द काढता, महिलांबद्दल काय बोलता, गड्यासारखं बोला, अशा शब्दात सुरेश धसांनी टीका केली. गोपीनाथराव मुंडे हे माझे गुरू असल्याचे देखील ते म्हणाले. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. राज्यात सर्व समाजात या महाविकास आघाडी सरकारविरुद्ध रोष असल्याचे देखील ते म्हणाले. विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे यावेळी देण्यात आले.
विजय वडेट्टीवार फडतूस
यावेळी भाजप सुरेश धस यांनी राज्य सरकारसह मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, विजय वडेट्टीवार म्हणतात, मराठा समाजाचा आयोगच बोगस आहे. मी तर म्हणतो वडेट्टीवारच बोगस, फडतूस आहेत. वडेट्टीवारांनी आमच्या बीड जिल्ह्यात येऊन दाखवावा. आई शप्पथ पोलिसांसह ये म्हणावं. बघ, आम्ही कसा सत्कार करतो अस म्हणत आमदार सुरेश धस यांनी मोर्चाच्या माध्यमातून वडेट्टीवारांना आव्हान केले आहे.
===Photopath===
280621\28_2_bed_4_28062021_14.jpg
===Caption===
मोर्चाला संबोधीत करताना आमदार सुरेश धस दिसत आहेत.