बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील अभिजित देशमुख (वय 35 वर्ष) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेली ही सातवी आत्महत्या आहे. अभिजित देशमुख यांनी मंगळवारी (31 जुलै) सकाळी घराजवळील एक झाडाला गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. त्यांच्या खिशात चिट्ठी सापडली असून त्यात मराठा आरक्षण, बँकेचे कर्ज आणि औषधांचा खर्च या कारणाने आत्महत्या करत आहे, असे लिहिल्याचे आढळले आहे. दरम्यान, संबंधित चिठ्ठी त्यांनीच लिहिली आहे का?, याचा तपास करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी सांगितले.
विज्ञाना विषयातून पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलेले अभिजित देशमुख नोकरी नसल्याने अस्वस्थ होते. त्यांच्यासह कुटुंबीयांवर बँकेचे कर्जही होते. आरक्षण न दिल्याने नोकरी नाही आणि व्यवसाय करण्यासाठी बँकेचे कर्जही मिळत नसल्याची बाब त्यानं मित्रांकडे व्यक्त केली होती. शिवाय, सध्या आरक्षण मागणीच्या विविध आंदोलनात त्याने सक्रिय सहभाग घेतला होता.
दरम्यान, मंगळवारी सकाळी अभिजित यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
सरकारला २४ तासांचा अल्टिमेटमशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे आजपर्यंत 7 तरुणांनी आत्महत्या केल्या. राज्यभर ठिय्या आंदोलने सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी २४ तासांत आरक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी सोमवारी औरंगाबादला केली. पाटील म्हणाले की, काहीजण राजकीय लाभासाठी आंदोलनाला हिंसक वळण देत आहेत. आजपर्यंत पाच समाजबांधव आमच्यातून गेलेत. मराठा क्रांती मोर्चा सरकारला सात मुद्द्यांचा ‘फॉर्म्युला’ देत आहे. राज्यमागास आयोगाला अहवाल देण्यासाठी तातडीने विनंतीपत्र किंवा आदेश द्यावेत. पत्राची तारीख जाहीर करावी. अहवाल प्राप्त झाल्यानंतर अध्यादेश काढण्याची तारीख जाहीर करावी, आयोगाचा अहवाल पूर्ण स्वीकारणार किंवा शिफारशी अंशत: स्वीकारणार, हे लगेच स्पष्ट करावे.