बीड : लोकसभा निवडणुकीत यावेळी जातीयवादाचे राजकारण मोठ्या प्रमाणात झाले. मतदानानंतर केज तालुक्यातील नांदुरघाटमध्ये मराठा आणि वंजारा असा वाद झाला. त्यानंतर याच तालुक्यातील मुंडेवाडीतील एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला. याच्या प्रतिक्रिया राज्यभरात उमटल्या. अशांमुळे जिल्ह्यातील एकोपा बिघडत होता. परंतु आजही असे काही गावे आहेत जिथे मराठा, वंजारा, मुस्लीम, दलित आदी समाजाचे लोक गुण्यागोविंदाने एकत्रित राहतात. एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी असतात. असाच सलोखा राहावा, यासाठी 'लोकमत'ने सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेतला आहे.
वडवणी तालुक्यातील मराठा समाजाची संख्या जास्त असलेली गावे कुप्पा, बाहेगव्हाण आणि वंजारा समाजाची चिंचवण, चिखलबीड येथील लोकांशी संवाद साधला. त्यांनी आमच्याकडे जातीयवादाला थारा नाही. एवढेच नव्हे तर गावातील प्रत्येक समाज जातपात न पाहता भाऊ, पाहुण्यासारखा राहतो. रोज एकमेकांसोबत चहापानही करत असल्याचे सांगितले.
चिंचवण ता. वडवणी:वडवणी शहराच्या दक्षिणेस साधारण १० किमी अंतरावर हे गाव आहे. हनुमान पुत्र मकरध्वजाचे येथे मंदिर असून, जानेवारी महिन्यात मोठी यात्रा भरते. सर्व समाजाचे लोक येथे एकत्र येऊन आठवडाभर उत्सव साजरा करतात. या गावात ६० ते ७० टक्के वंजारा समाजाची घरे आहेत. परंतु त्यांनीही दोन वेळा मराठा समाजाचा सरपंच निवडून दिला आहे. रमजानमध्ये मुस्लीम बांधवांकडे जाऊन जेवण करतात. सर्व समाज एकमेकांच्या सोबत असतात. सोज्वळ भाषा आणि गाठीभेटी यामुळे आतापर्यंत या गावात कधीही जातीयवाद झाला नाही. यापुढेही करणार नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.
गावात जातीयवाद नाही, होऊ पण देणार नाहीनिवडणुकीपुरते राजकारण असते. नंतर आम्ही सर्व एकत्रित राहतो. मकरध्वज मंदिरात सर्व समाजाचे विवाह होतात. आम्ही सर्व घरचा कार्यक्रम असल्यासारखे काम करतो. आमच्या गावात जातीयवाद नाही आणि होऊ पण देणार नाही.- सोमनाथ बडे, ज्येष्ठ नेते, चिंचवण
चिखलबीड:या गावात ३ हजार २०० मतदान आहे. ९० टक्केपेक्षा अधिक घरे वंजारा समाजाची आहेत. इतरही समाज येथे राहतो. शेती, शेजारीपाजारी यामुळे येथील सर्व समाजाचे लोक पाहुण्यासारखे राहतात. एकमेकांकडे नेहमी ये-जा करतात. रोज एकमेकांना नमस्कारही करतात. गावातील जगदंबा देवीच्या यात्रेत सर्व लोक एकत्र येतात. आनंदाने प्रत्येक सण-उत्सव साजरा करतात. एकमेकांचा आदर करणारे हे गाव आहे.
सुख-दु:खात सहभागी असतोचशेती, शेजारी यामुळे रोज एकमेकांचा संपर्क येतोच. असेही शहरासारखे गावात वातावरण नसते. ग्रामीण संस्कृती जपून एकमेकांना मदत केली जाते. सुख-दु:खात सहभागी असतोच. आम्ही जातीयवाद केला नाही. मराठा समाजासोबतही आम्ही सक्रिय असतो.- विकास मुंडे, माजी सरपंच चिखलबीड
बाहेगव्हाण, ता. वडवणी:बीड-परळी हायवेवर हे गाव आहे. या गावात ९० टक्केपेक्षा अधिक घरे ही मराठा समाजाची आहेत. परंतु इतरही समाजाच्या लोकांना सोबत घेऊन ते चालतात. राजकारण हे निवडणुकीपुरते केले जाते. त्यानंतर मात्र, एकमेकांच्या सोबत असतात. मराठा आरक्षण लढ्यातही या गावातील अनेक तरुण सहभागी झाले होते. वडवणी तालुक्यातील वंजारा व इतर समाजातील लोकांसोबत या सर्वांचे मैत्रीपूर्ण नाते आहे. जातीयवादाला येथील लोक थारा देत नाहीत.
निवडणुकीपुरतेच राजकारणगावात ९० टक्केपेक्षा अधिक घरे ही मराठा समाजाची आहेत. परंतु, आम्ही निवडणुकीपुरतेच राजकारण करतो. इतर वेळी सर्व एकत्रित असतो. गावात जरी मराठा समाज जास्त असला तरी इतरही समाजाला सोबत घेऊन काम करतो. एकमेकांच्या घरी चहापानही करतो.- सिद्धेश्वर मस्के, उपसरपंच, बाहेगव्हाण
कुप्पा ता. वडवणी:गावात साधारण ३ हजार २०० मतदान आहे. वंजारा, धनगर, मुस्लीम, दलित आदी समाजाचे लाेक राहतात. या गावात जनावरांचा मोठा बाजार भरतो. बीडसह परजिल्ह्यातील व्यापारी प्रत्येक गुरुवारी गावात येतात. बाजाराचे गाव असल्याने परिसरातील सर्व समाजाचे लोक गावात येतात. परंतु, आतापर्यंत एकदाही या गावात जातीयवादावरून वाद झालेला नाही. गावात आलेल्या प्रत्येकाला सन्मानाची वागणूक दिली जाते. तसेच एरव्ही देखील सर्व जण गुण्यागोविंदाने एकत्रित राहतात.
आम्ही सलोखा ठेवलागावात जनावरांचा मोठा बाजार भरतो. येथे सर्व समाजाचे लोक येतात. आमच्या गावातने कधीही जातीयवाद केला नाही. सर्वांना समान वागणूक दिली. उलट कोणाला काही अडचण वाटली तर तातडीने मदतीची भावना असते. कोणत्याही समाजाचा कार्यक्रम असला तरी मराठा समाजाचे तरुण काम करण्यासाठी उभे असतात. मराठा समाजाच्या कार्यक्रमाही इतर समाजाचे लोक उभे असतात. आम्ही सलोखा ठेवला आणि ठेवणार.- सुभाष सावंत, सरपंच कुप्पा