माजलगाव : भाषेची भूमिका असते अभिरुची वाढवणे,आपल्याला मराठी व्यवस्थित बोलता,वाचता, लिहिता यावी कारण व्यक्तिमत्त्व विकासात भाषेला अनन्यसाधारण स्थान असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षक, मराठी भाषेचे गाढे अभ्यासक संतोष जोशी यांनी केले.
म.ज्यो.फुले माध्यमिक विद्यालयाच्या आंतरजालीय थेट कार्यक्रमात (ऑनलाईन) मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी आणि मुख्याध्यापक प्रभाकर साळेगावकर होते. सहशिक्षिका अर्चना भाले यांच्या संकल्पनेतून सोशल मीडियावर पत्रलेखन,कविता पाठांतर, कवी लेखकाचे चित्र रेखाटने, साहित्यिक परिचय देणे आदी स्पर्धा घेण्यात आल्या. सातवी पाठ्यपुस्तकातील नाटिका ऑनलाईन सादर करुन एक अनोखा उपक्रम लक्षवेधी ठरला. नियती जावळे हिने मराठवाडा गीत सादर केल्यानंतर ऑनलाईन कार्यक्रम सुरु झाला. प्रास्ताविक प्रतिभा कांचले यांनी केले. विद्यार्थ्यांनी मनोगत मांडले. कोरोनाकाळातील शिक्षणात शिक्षकांची भूमिका अर्चना दायमा यांनी मांडली. विजयकुमार कुलकर्णी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
अध्यक्षीय समारोप करताना कवी प्रभाकर साळेगावकर म्हणाले, मराठी भाषा चिमुकल्यांकडून तंत्रज्ञानाशी जोडली जात आहे. कोरोनाकाळातील अशी ही सर्जनशीलता मनाला उभारी देणारी आहे. नाटिकेतील कलावंत, स्पर्धेतील स्पर्धक, सतत धडपडणारे सहकारी यांचा अभिमान वाटतो. मराठी शब्द, विशेषण, वाक्यांची मोडतोड न करता वापरणे हेच वर्तमानात मराठीचे संवर्धन आहे.
यावेळी विद्यालयात दर्शनी भागातील भिंतीवर मराठीभाषेतील ज्ञानपीठ पुरस्कार मिळवलेल्या साहित्यिकांची ओळख सांगणारा कायमस्वरुपी फलक उभारण्यात आला. सूत्रसंचालन अर्चना भाले यांनी केले.
विद्यार्थिनी घडसे हिने ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ’हे गीत सादर केले. प्रवीण काळे, संजीवनी मेहत्रे, प्रतिभा गणोरकर,अर्चना भाले यांनी विविध स्पर्धांचे परीक्षण केले.
विविध स्पर्धेचा निकाल
प्रथम क्रमांक : अन्सारी शिफा युनूस, द्वितीय : सुबोधी जावळे. तॄतीय : नियती नितीन जावळे,पत्रलेखन स्पर्धेत प्रथम साक्षी संजय लिंगे, द्वितीय अश्विनी भगवान घडसे, तृतीय निलोफर फसियोद्दीन इनामदार, कवी व लेखक चित्र स्पर्धेत सुबोधी जावळे प्रथम, सय्यद आयेशा अय्युब द्वितीय तर संबोधी अविनाश जावळे हिने तृतीय क्रमांक मिळवला. पाठ्यपुस्तकातील कवींचा परिचय स्पर्धेत सुबोधी जावळे प्रथम, वैष्णवी चव्हाण द्वितीय आणि नियती जावळे हिने तृतीय क्रमांक पटकावला.