लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मंगळवारी येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय समारंभ उत्साहात पार पडला. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर पोलीस उपअधीक्षक श्रीकांत डिसले यांच्या नेतृत्वाखाली संचालनासाठी उपस्थित पोलीस, होमगार्ड, एन.सी. सी. आदी विविध पथकांनी मानवंदना दिली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्यासह मान्यवरांनी परेडचे निरीक्षण केले. त्यानंतर संचलनामध्ये पोलीस सशस्त्र दलाचे पथक, महिला पोलीस पथक, पुरुष,महिला होमगार्ड पथक, बलभीम महाविद्यालय, के.एस.के. महाविद्यालय, बंकटस्वामी महाविद्यालयांचे एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांची पथके, एन.सी. सी. विद्यार्थिनींचे पथक, सैनिक विद्यालय, पोलीस बॅन्ड पथक यांच्यासह दंगल नियत्रंक वाहन, वज्रवाहन, महिलांचे दामिनी गस्ती वाहन, रुग्ण्वाहिका १०८ आणि अग्निशमन वाहनांनी भाग घेतला. यावेळी जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी उपस्थित स्वातंत्र्यता सेनानी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या.मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मुख्य शासकीय समारंभापूर्वी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी प्रियदर्शनी उद्यानातील स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. तसेच पोलीस पथकाच्या वतीने तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. यावेळी जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, मुक्तिसंग्रामातील सेनानी बन्सीधरराव जाधव यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी मुक्तीसंग्रामातील सेनानी पंडित रंगनाथ कापसे, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पोलीस उपअधीक्षक भास्कर सावंत यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, अधिकारी, पदाधिकारी, नागरिक यावेळी उपस्थित होते.
बीड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन सोहळा उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:48 AM