लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : भूमिहीन शेतमजुर व बेघर लोकांच्या विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांनी केले. पावसात निघालेल्या या मोर्चात भूमीहीन शेतमजुर व बेघर स्त्री-पुरूष शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले.तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात शेतमजुरांना दुष्काळी श्रमभत्ता म्हणून प्रति रेशनकार्ड रूपये २० हजार रूपये अनुदान द्या,बेघर लोकांना सर्वे नंबर -१७ मध्ये घरे द्या, पंचशील नगरचे घाटनांदुरला जोडलेले स्वस्त धान्य दुकान, सदर बाजार येथील स्वस्त धान्य दुकानांवर कार्यवाही करणे तसेच ममदापूर येथील दलित वस्ती व गावच्या स्मशानभूमीचा प्रश्न तात्काळ निकाली काढून जमीनीची मोजणी करावी आदी मागण्यांचा समावेश होता.पोलीस ठाण्याच्या समोरुन भर पावसात निघालेला मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर तहसीलदारांना निवेदन दिले. आंदोलनात कॉ. बब्रुवाहन पोटभरे, धम्मानंद पिसाळ, दिलीप सरवदे,छाया तरकसे, मीरा पाचिपंडे, कल्पना सरवदे, सारिका सरवदे, अनिल ओव्हाळ, पुनिमसंग टाक, दीपक गायकवाड, हिंमत सिंग, दिनकर सरवदे आदींसह शेतमजूर व बेघरांचा सहभाग होता.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 1:16 AM