माजलगाव (बीड) : शहरातील समता कॉलनी भागातील साधना आक्रुर सोळंके या विवाहितेनी पती व सासु-सास-याच्या जाचास कंटाळुन गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी सासरच्या चार जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील मनोहर साहेबराव घाडगे यांची मुलगी साधना (२८) हिचा विवाह माजलगाव येथील अर्जुन सोळंके यांचा मुलगा आक्रुर याच्यासोबत काही वर्षांपूर्वी झाला. त्यांतर त्यांना मुलगा झाला. मात्र, लग्नात ठरलेल्या २ लाख रुपयाच्या हुंड्याची मागणी करत गेल्या वर्षभरापासुन सासरच्यांनी साधनाचा शारीरिक व व मानसिक छळ केला. तसेच साधनाला गेल्या वर्षभरात आई-वडिलांना भेटण्यास माहेरीसुद्धा जाऊ दिले नाही. यामुळे सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून साधनाने रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी साधनाचे वडील मनोहर घाडगे यांच्या फिर्यादीवरुन पती आक्रुर अर्जुनराव सोळंके, सासरा अर्जुन सोळंके, सासु शोभा सोळंके सह चुलत सासु कस्तुराबाई सोळंके यांच्या विरोधात हुंड्यासाठी छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी कलम ३०४( ब) ,३०६ ,१४९,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पती व सासरा यांना अटक करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक प्रियंका फंड ह्या करत आहेत.