माजलगाव : शहरातील मेडिकल वगळता सर्व व्यापाऱ्यांनी विकेंड लॉकडाऊनचा जिल्हा प्रशासनाकडून काहीच आदेश नसताना येथील नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आदेश काढण्याऐवजी चक्क त्यांच्या स्टेटसवरच आदेश काढल्याने शनिवारी सकाळपासूनच व्यापाऱ्यात संभ्रम निर्माण झाला. यात काही व्यापाऱ्यांनी लेखी दाखवल्याशिवाय बंद करण्यास विरोध दर्शविला.
महाराष्ट्र शासनाने १५ दिवसापूर्वी विकेंड लॉकडाऊनच्या अंतर्गत शनिवार व रविवारी मेडिकल वगळता सर्व व्यवहार बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे माजलगाव शहरासह संपूर्ण जिल्हा १० व ११ एप्रिलला बंद होता. त्यानंतर शासनाचे नवीन नियम निघाल्याने विकेंड लॉकडाऊन अंतर्गत १७ व १८ एप्रिल रोजी व्यापाऱ्यांनीही बंद केले नाही व प्रशासनाने देखील त्यांना हटकले देखील नाही.
येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी शुक्रवारी २३ एप्रिल रोजी आपल्या स्टेटसवर विकेंड लॉकडाऊनच्या अंतर्गत मेडिकल वगळता सर्व बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. यात कोणी दुकाने उघडी ठेवल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासह दुकाने सील करणे व दुकानाचा परवाना रद्द करण्यात येतील, असे या स्टेटसमध्ये नमूद केले आहे.
मुख्याधिकाऱ्यांनी स्टेटसवर आदेश काढल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
पोलीस निरूत्तर
सकाळपासूनच पोलीस दुकाने बंद करण्यास सांगत होते. या बंदला काही व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवत आम्हाला शासनाचे किंवा जिल्हा प्रशासनाचे लेखी दाखवा म्हणताच पोलीस देखील निरुत्तर झाले.
स्टेटसवर आदेश चुकीचे
व्यापाऱ्यांनी बंद ठेवून प्रशासनास सहकार्य करावे असे आम्ही सांगितले होते. आम्ही बंदचे आदेश लेखी स्वरूपात दिले नव्हते फक्त आवाहन केले होते. मुख्याधिकारी यांनी स्टेटसवर आदेश काढले असतील ते चुकीचे आहे.
-- वैशाली पाटील , तहसीलदार, माजलगाव
-------
प्रशासनाला सहकार्य करा
तालुका प्रशासनाने बंद ठेवण्याबाबत व्यापाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. मुख्याधिकाऱ्यांनी राजा महाराजा सारखे लेखी आदेश काढण्याऐवजी स्टेटसवर मेसेज टाकल्याने व्यापाऱ्यात संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी अनेकांना जबरदस्तीने बंद करण्यास भाग पाडले. आम्ही केव्हाही प्रशासनास मदत करण्यास तयार असून अशा प्रकारे मेसेजवर बंदला आमचा विरोध आहे.
--- संजय सोळंके ,अध्यक्ष किराणा असोसिएशन ,माजलगाव
-------
===Photopath===
240421\img_20210424_102520_14.jpg~240421\img_20210424_103531_14.jpg