- पुरूषोत्तम करवामाजलगाव: येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आ. प्रकाश सोळंके यांनी विद्यमान सभापती व उपसभापती यांच्या उमेदवारी ऐनवेळी कापली आहे. यामुळे आ. सोळंके यांनी पुत्राला सभापती पदासाठी ठरू शकणारे अडथळे दूर केल्याची चर्चा आहे.
येथील बाजार समितीचे निवडणूक ३० एप्रिल रोजी होणार आहे. १८ जागेसाठी ५४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यामध्ये मुख्य लढत आ. प्रकाश सोळंके व छत्रपती कारखान्याचे व्हाईस चेअरमन मोहन जगताप यांच्या गटात होणार आहे.
दरम्यान, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात अनेक घडामोडी घडल्या. आ. प्रकाश सोळंके यांनी विद्यमान सभापती संभाजी शेजुळ व उपसभापती लता अच्युत लाटे यांची ऐनवेळी उमेदवारी कापली. आपल्या पुत्राला सभापतीपदी बसवण्यासाठी कोणाचाही अडथळा निर्माण होऊ नये शेजूळ आणि लाटे यांची उमेदवारी कापण्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, विद्यमान सभापती- उपसभापती यांची उमेदवारी कापल्याने आमदार प्रकाश सोळंके यांना आगामी काळात अडचणी निर्माण होऊ शकतात.