केज : येथील खरेदी विक्री संघाच्या शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली तूर, हरभरा, सोयाबीन आदी शेतीमाल प्रति क्विंटल अकरा किलो अधिक घेतल्याच्या तक्रारी सहायक निबंधकाकडे केल्या. या तक्रारीची दखल आ. सुरेश धस यांनी घेतली. या संदर्भात पणन मंत्र्यासह पणन संचालकाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन पणन संचालकांनी केज येथील खरेदी विक्री संघातील गैरव्यवहाराच्या चौकशीस कोल्हापूर येथील विषेश लेखा परिक्षकाच्या चौकशी समितीमार्फत बुधवारपासून सुरुवात केली आहे.
केज येथील खरेदी विक्री संघाच्या मार्फत शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर शेतक-यांच्या सोयाबीन, हरभरा, उडीद आदी पिकांची खरेदी करण्यासाठी शेतक-यांनी आणलेल्या शेती मालाचे वजन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वजन काट्यावर करण्याचे सोडून शेतकºयांचा शेतीमाल हरभरा, सोयाबीनचे वजन येडेश्वरी साखर कारखान्याच्या वजन काट्यावर करीत शेतकºयांचा हरभरा प्रति क्विंटल मागे अकरा किलो अतिरिक्त घेतला. याबाबत व शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर जादा हमाली घेतली जात असल्या बाबतीत ७५ ते ८० शेतक-यांनी ११ अर्जाद्वारे सहायक निबंधक कार्यालयात सामाईक तक्रारी केल्या होत्या.
या तक्रारीची चौकशी जिल्हा निबंधकांच्या आदेशानुसार सहाय्यक निबंधक कार्यालयात चालू असतानाच केज येथील शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर शेतकºयांचा अकरा किलो शेतीमाल हरभरा, तूर, सोयाबीन अतिरिक्त घेतल्याच्या तक्रारीची दखल आ. सुरेश धस यांनी घेतली. या बाबतीत अधिवेशनातही आवाज उठवला होता व या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पणन राज्य मंत्री व पणन संचालक यांच्याकडे केली. त्यानंतर पणन संचालकांनी केज येथील खरेदी विक्री संघाच्या मार्फत शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर शेतक-यांचा शेतीमाल खरेदीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली.
कोल्हापूरचे विशेष लेखा परीक्षक वर्ग १ यांच्या मार्फत चौकशीस सुरुवात केली आहे. या प्रकरणी कोल्हापूरचे विशेष लेखा परीक्षक जी. व्ही. निकाळजे यांनी बुधवार, २९ आॅगस्ट रोजी केज येथे येऊन चौकशीस सुरुवात करुन शेतकºयांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. यावेळी उपस्थित शेतकºयांनी आपली कशी लूट करण्यात आली या बाबतीत पुराव्यासह लेखी म्हणणे मांडले.शेतक-यांच्या तक्रारी ऐकून व लेखी स्वरूपात घेतल्या नंतर रेकॉर्डची तपासणी केली जाईल. त्या अनुषंगाने अहवाल शासनाकडे सादर केला जाईल तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचा वजनकाटा असताना दुसरीकडे शेतक-यांच्या शेतीमालाचे वजन का करण्यात आले ? याचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे कोल्हापूरचे विशेष लेखा परीक्षक जी. व्ही. निकाळजे यांनी सांगितले.