मार्चअखेर व बँका बंदच्या भीतीने बँकेतही गर्दी झाली होती. त्यामुळे मोजक्या ग्राहकांना आत घेऊन कारभार केला जात असल्याचे दिसून आले. बीड जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिल यादरम्यान जिल्हाधिकारी बीड यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॕॅकडाऊन जाहीर केले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांत मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, लाॕॅकडाऊनच्या भीतीने गुरुवारी धारूरच्या बाजारपेठेत चांगलीच गर्दी झाली होती.
आठवडी बाजारासारखे स्वरूप आले होते. सर्व आवश्यक वस्तूंची दुकाने गर्दीने गच्च होती. काही वस्तूंचा साठा करण्याच्या हेतूने आवाजवी भावात ते विक्री होत होते. बँका बंद राहणार या भीतीने बँकेत ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे गर्दी रोखण्यासाठी बँकेत मोजक्या ग्राहकांना प्रवेश दिला जात होता. बसस्थानकावरही प्रवाशांची गर्दी झाल्याचे दिसत होते. या लाॕॅकडाऊनचा सर्वसामान्यांनी मात्र चांगलाच धसका घेतल्याचे दिसत होते. शेतकरी व भाजीपाला उत्पादक मात्र या लाॕॅकडाऊनची चिंता व्यक्त करीत आहेत.
धारूर येथील युवक शेतकरी सुहास शिनगारे यांनी या लाॕॅकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत. शासनाने निर्बंध कडक करावेत, मात्र लाॕॅकडाऊन करून शेतकऱ्यांना व सर्वसामान्यास अडचणीत आणू नये अशी मागणी केली आहे.