पुरुषोत्तम करवा
माजलगाव : एक दोन नव्हे तर तीन अवघड शस्त्रक्रिया पूर्ण करून स्त्री मधून पुरूष असे लिंग बदल केलेल्या ललीतकुमार साळवे यांचा विवाह सोहळा रविवारी औरंगाबादमध्ये थाटात झाला. ललीतकुमार हे सध्या बीड जिल्ह्यातील माजलगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत. लिंगबदलाचे हे प्रकरण महाराष्ट्रात गाजले होते.
मालगाव तालुक्यातील राजेगाव येथील ललीतकुमार हे मुळ रहिवाशी. ते पोलीस दलात महिला (आगोदरचे नाव ललीत साळवे) म्हणून भरती झाले. परंतु नंतर त्यांच्यात शरिरातील हार्मोन्स बदलामुळे त्यांनी लिंग बदलाची इच्छा व्यक्त केली होती. याबाबत तत्कालीन पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्याकडे अर्ज करताच त्यांनी महासंचालकांकडे मार्गदर्शन मागविले. यावर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनीही प्रतिक्रिया देत लिंगबदलाची परवानगी दिली होती. त्याप्रमाणे मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्यांच्या नोकरीवर गदा येईल? असे बोलले जात होते. परंतु महाराष्ट्र पोलिसांनी हे प्रकरण ह्यविशेषह्ण असल्याचे सांगत त्यांना पोलीस दलात पुन्हा दाखल करून घेतले. सध्या ते माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.दरम्यान, लिंगबदलानंतर त्यांच्या जिवनात वेगळा आनंद निर्माण झाला होता. आता त्यांनी लग्नाची इच्छाही व्यक्त केली होती. अशातच त्यांची आणि औरंगाबाद येथील सीमा नामक मुलीची एका कार्यक्रमात भेट झाली. सिमाच्या नातेवाईकांनी ललीतकुमारच्या नातेवाईकांसोबत लग्नाची बोलणी केली. दोघांचीही पसंती जुळली आणि रविवारी सायंकाळी औरंगाबादमधील बुद्ध लेणीमध्ये थाटात विवाह पार पडला. यावेळी दोन्हीकडी वऱ्हाडी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तेव्हा गावाने टॉवेल, टोपी देऊन केला सन्मानलिंगबदलाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर ललीतकुमार हे आपल्या राजेगाव या मुळगावी आले. यावेळी नातेवाईकांसह संपूर्ण गावाने त्यांची मिरवणूक काढत टॉवेल, टोपी देऊन सत्कार केला होता. फटाके वाजवणू जल्लोष केला होता. तो दिवस गावासाठी आनंदाचा होता, असे सांगण्यात आले.
राज्यातील पहिलेच प्रकरण लिंगबदल करण्याचे हे राज्यातील पहिलेच प्रकरण होते. अर्ज येताच संपूर्ण महाराष्ट्र पोलीस विचारात पडले होते. अखेर महासंचालकांनी परवानगी दिली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर नौकरीवर गदा येईल, असे वाटत होते. परंतु महाराष्ट्र पोलीस दल आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी यावर योग्य कार्यवाही करून ललीतकुमार पोलीस दलात कायम ठेवले.
पुनर्जन्मानंतरचा सर्वात आनंदी क्षणमाझ्यावर तीन वेळा शस्त्रक्रिया झाल्यानंतर मला पुनर्जन्म भेटला होता. या लग्नाने माझ्या आयुष्यात नवीन सुरुवात होत असून यापुढे मी आनंदात संसार करणार आहे. या लग्नामुळे माझे घरचे व नातेवाईक अतिशय खुश झाले आहेत. - ललितकुमार साळवे