२२ लाख रुपयांचा लोकसहभाग : धर्मेवाडीत उभारले मंगल कार्यालय
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : तालुक्यातील धर्मेवाडी येथील ग्रामस्थांनी शेतीच्या नुकसानाचे मिळालेले अनुदान गावाच्या विकासासाठी दिले असून, तब्बल २२ लाख रुपये लोकसहभागातून जमा करत गावातच अद्ययावत मंगल कार्यालय उभारले आहे. गावातील लग्नसोहळा, मंगल कार्यक्रम, सप्ताह व इतर सार्वजनिक कार्यासाठी या मंगल कार्यालयाचा उपयोग होणार आहे. धर्मेवाडी ग्रामस्थांच्या या विधायक कामाची तालुक्यात चर्चा सुरू आहे.
तालुक्यातील धर्मेवाडी हे ५०० लोकसंख्येचे गाव असून, गावामध्ये पूर्वीपासूनच सामाजिक एकोप्याचे वातावरण आहे. गावातील विवाहयोग्य मुला-मुलींच्या लग्नासाठी शहरामध्ये मंगल कार्यालय भाड्याने घ्यावे लागत असे. यासाठी मोठा खर्च वधूपित्याला करावा लागत होता. यावर मात करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. शासनाकडून शेतीच्या नुकसानभरपाईपोटी आलेले १४ लाख रुपये व त्यामध्ये गावकऱ्यांनी अधिकची रक्कम जमा करत आणखी ८ लाख रुपयांच्या लोकसहभागातून गावात अद्ययावत असे मंगल कार्यालय उभारले आहे.
दिवसेंदिवस शेती व्यवसाय अडचणीचा ठरत आहे. त्यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशा परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. तरीही गावाचा विकास झाला पाहिजे, ही प्रत्येक ग्रामस्थाची भावना होती. शासनाच्या स्वच्छता अभियानाला प्रतिसाद देत गावामध्ये स्वच्छता करण्यात आली आहे तसेच शंभर फळझाडे याठिकाणी लावण्यात आली आहेत. दरम्यान, गावातील विवाह व इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी आता धर्मेवाडीच्या ग्रामस्थांना हक्काचे मंगल कार्यालय उपलब्ध होणार आहे.
जेमतेम पाचशे लोकसंख्या असलेल्या या गावात शासनाच्या योजना अत्यल्पच राबविल्या गेल्या. गावाचा विकास झाला पाहिजे, या ध्येयाने प्रेरित होऊन युवक, शेतकरी, कष्टकऱ्यांनी एकत्र येत मोठ्या प्रमाणावर लोकसहभागातून रक्कम जमा करत आज आदर्श निर्माण केला आहे.
धर्मेवाडीमध्ये मंगल कार्यालय उभारणी, स्वच्छता अभियान, वृक्षलागवड यासह विविध विकासकामे प्राधान्याने मार्गी लागावीत, यासाठी ग्रामस्थांना वेळोवेळी एकत्रित आणण्याबरोबरच त्यांच्यामध्ये समन्वय साधल्यामुळे आज ही कामे मार्गी लागली आहेत.
- पांडुरंग चांडक, ग्रामस्थ.
अद्ययावत उभारण्यात आलेल्या या मंगल कार्यालयाचा लोकार्पण सोहळा बुधवारी पार पडला तर श्री संत माऊली मंदिराचे भूमिपूजन गुरुवारी करण्यात आले. यानिमित्त निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.