लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटचा एकही रुग्ण सापडलेला नसला तरी राज्यात २१ रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात काही कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात कायम मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे. याच त्रिसूत्रीची प्रत्येक नागरिकाने प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’ला ब्रेक लावणे सहज शक्य होईल. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील कोरोना कक्षाचे प्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार यांनी केले आहे.
व्हायरस कुठलाही असो, तो नेहमी त्याची आनुवंशिक रचना बदलत राहतो. विषाणू जेव्हा त्याची रचना बदलतो, तेव्हा त्याला शास्त्रज्ञ एक नवीन नाव देतात. अशाच आनुवंशिक रचना बदललेल्या व्हायरसला शास्त्रज्ञांनी ‘डेल्टा प्लस’ हे नाव दिले आहे. मनुष्यासाठी घातक समजल्या जाणाऱ्या या व्हायरसच्या प्रसाराला आपण कायम मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवल्याने ब्रेक लावू शकतो. अशी खबरदारी बाळगण्याचे त्यांनी सांगितले. ज्या पद्धतीने आपण समय चकता बाळगून कोरोनावर मात करीत आहोत, त्याच पद्धतीने ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’वरही मात करता येते. त्यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची व कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्यावी.
...
वेळीच लसीकरण करून घ्यावे
आतापर्यंत वापरत असलेली लस व्हेरिएंटवर प्रभावी आहेच. बऱ्याचवेळी अशाप्रकारे आनुवंशिक बदलांमुळे व्हायरस नष्ट होतात. पण जेव्हा जेव्हा व्हायरस बदलतो तेव्हा तेव्हा धोका असतो, असे म्हणता येत नाही. कारण कधी व्हायरस कमकुवत तर कधी आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करतो. असे असले तरी लाभार्थ्यांना देण्यात येणारी लस ही कोविड मृत्यू रोखण्यासाठी परिणामकारकच आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर जाऊन कोविडची प्रतिबंधात्मक लस घेतली पाहिजे.
....
कुठलाही व्हायरस त्याची आनुवंशिक रचना बदलतो. असाच बदल झालेला नवा व्हेरिएंट म्हणजे डेल्टा प्लस आहे. पण नागरिकांनी त्याला घाबरून जाऊ नये. खबरदारीचा उपाय म्हणून वेळीच कोविडची लस घ्यावी. हात नेहमी स्वच्छ ठेवावेत. मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करावा. गर्दीत जाणे टाळावे.
-डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, कोरोना कक्ष प्रमुख, स्वाराती रुग्णालय, अंबाजोगाई.