लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सिझर होऊन प्रसुत झालेल्या मातेचा अवघ्या २९ तासांतच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजता घडली. यात मातेने जन्म दिलेला चिमुकला सुखरूप आहे. बीडच्या जिल्हा रूग्णालयातील माता मृत्यूने खळबळ उडाली आहे. दरम्यान, नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे.अश्विनी विष्णू कळसुले (२४ रा.नागझरी ता.बीड) असे या मातेचे नाव आहे. १६ सप्टेबर रोजी अश्विनी यांना सकाळी ९ वाजता जिल्हा रूग्णालयात दाखल केले. १२ वाजेच्या सुमारास त्यांना शस्त्रक्रिया गृहात घेऊन त्यांचे सिझर केले. यावेळी त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर अवघ्या चार ते पाच तासांनी तिच्या छातीत दुखायला सुरूवात झाली. नातेवाईकांनी डॉक्टरांना कळविले. उपचारही करण्यात आले. मात्र, त्यानंतर हा त्रास कमी झालाच नाही. शेवटी १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी अंदाजे पाच वाजेच्या सुमारास अश्विनी यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू केल्यानंतर अवघ्या दोन तासांतच त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी नातेवाईकांनी रूग्णालय परिसरात टाहो फोडला.दरम्यान, अश्विनीच्या छातीत दुखत असल्याबाबत वारंवार येथील परिचारीका आणि डॉक्टरांना सांगितले होते. मात्र, त्यांनी उपचाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. उपचारात हलगर्जी आणि वेळेवर उपलब्ध न होणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे. याबाबत त्यांनी लेखी कसलीही तक्रार आरोग्य विभागाकडे केली नसल्याचेही समजते.चिमुकल्याची प्रकृती ठणठणीतअश्विनी यांनी एका चिमुकल्याला जन्म दिला आहे. सध्या हे बाळ नातेवाईकांकडे आहे. त्याला वरवरचे दुध पाजले जात आहे. सध्या त्याची प्रकृती ठणठणीत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
प्रसुतीनंतर २९ तासांतच मातेचा मृत्यू; चिमुकला सुखरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 1:18 AM