बीड : पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथील श्री क्षेत्र हनुमानगडचे मठाधिपती बुवासाहेब खाडे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ४ ऑगस्ट रोजी त्यांच्याविरुद्ध खर्डा (जि. अहमदनगर) ठाण्यात एका महिलेने लैंगिक अत्याचाराची फिर्याद दिली. त्याआधी मठाधिपतींनीही मारहाण करून धमकावल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा नोंदविला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
हनुमानगडाचे मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे (५६) यांच्या तक्रारीनुसार, २९ जुलै रोजी ते मोहरी (ता. जामखेड, जि. अहमदनगर) येथे महादेवाच्या मंदिराचे काम पाहण्यासाठी गेले होते. यावेळी बाजीराव गित्ते, भिवा गोपाळघरे, अरुण गिते, राहुल गिते व रामा गिते यांनी मठाधिपती खाडे यांना घुगे वस्तीवरील बाजीराव गिते यांच्या घरात बोलावून घेतले. पहाटे दीड वाजेच्या सुमारास राहुल गिते याने मोबाइलमधील फोटो दाखवून दमदाटी करत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी त्याने दोरी दाखवून फाशी देण्याची धमकी दिली.
पहाटे साडेपाच वाजता तो कोयता घेऊन अंगावर धावला. जीवे मारण्याची धमकी देत सोन्याची चेन, अंगठ्या, मणी असा १३ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला. यावरून खर्डा ठाण्यात पाच जणांवर ३ ऑगस्ट रोजी गुन्हा नोंद झाला आहे.
दरम्यान, ४ ऑगस्ट रोजी मोहरी (ता. जामखेड ) येथील २९ वर्षीय महिलेने रात्री सव्वानऊ वाजता खर्डा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, जून ते १२ जुलै २०२२ दरम्यान मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांनी सोन्याचे दागिने व लग्न करण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. यावरून गुन्हा नोंदविण्यात आला.