लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मॅनेजमेंट आॅफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचा (एमबीए) तृतीय वर्षाचा पेपर बुधवारी सकाळी अचानक रद्द करण्यात आला. यामुळे परीक्षा केंद्रांवर आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना परत जाण्याची वेळ आली.
दरम्यान, कसलीच माहिती न देता पेपर रद्द झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. दुरवरून आलेल्या विद्यार्थ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. एकूणच या सर्व प्रक्रियेत त्यांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद अंतर्गत एमबीएच्या परिक्षा सुरू आहेत. बीडमध्ये बलभीम महाविद्यालय हे परीक्षा केंद्र आहे. २७ नोव्हेंबर पासून बीडमध्ये परीक्षाला सुरुवात झाली. सुरूवातीचे सर्व पेपर सुरळीत झाले. बुधवारी सकाळी १० ते १ या दरम्यान ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी फॉर सोशल डेव्हलपमेंट’ या विषयाचा पेपर होता. त्यादृष्टीने विद्यार्थी अभ्यास करून केंद्रावर आले. परंतु येथे आल्यानंतर पेपर रद्द झाल्याची माहिती त्यांना मिळाली.
विद्यार्थ्यांना कसलीही पूर्व कल्पना न देता हा पेपर अचानक रद्द केल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. विद्यापीठाच्या गलथान कारभाराचा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना मोठा फटका सहन करावा लागला.सहा जिल्ह्यांतील विद्यार्थीबीडसह, परभणी, जालना, वाशीम, बुलढाणा, औरंगाबाद, परभणी या चार जिल्ह्यातून शेकडो विद्यार्थी बीड शहरात परीक्षा देण्यासाठी आले होते. परंतू पूर्वसुचना न देता पेपर रद्द केल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला. तसेच त्यांना मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागला.
महाविद्यालयास उशिरा पत्रएमबीए अभ्यासक्रमाचा सर्व्हिस कोर्स तृतीय सत्राऐवजी चतुर्थ सत्रात घेण्यात येणार आहे, असे पत्र बलभीम महाविद्यालयाला मंगळवारी उशिरा मिळाले. ही परीक्षा चतुर्थ सत्रासाठी मार्च/एप्रिल २०१८ ला होणार असल्याचे पत्रात नमूद आहे.