'मैं भी नायक'; छत्तीसगड आणि पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी अंबाजोगाईचे युवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 07:22 PM2019-09-24T19:22:36+5:302019-09-24T19:24:11+5:30

अभियंता शहेबाज मणियार आणि विजय अंजान यांची दहा हजार स्पर्धकांमधून निवड

'Me too Nayak'; Ambajogai Youths become Chief Minister of Chhattisgarh and Punjab | 'मैं भी नायक'; छत्तीसगड आणि पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी अंबाजोगाईचे युवक

'मैं भी नायक'; छत्तीसगड आणि पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी अंबाजोगाईचे युवक

Next
ठळक मुद्देयुथ काँग्रेस आयोजित अनोखी स्पर्धा 

अंबाजोगाई : 'मैं भी नायक, सी.एम. फॉर अ डे'  या  युथ काँग्रेस आयोजित अनोख्या मोहिमेत छत्तीसगडपंजाबच्या मुख्यमंत्रीपदी अंबाजोगाई येथील युवकांची निवड झाली. छत्तीसगडसाठी शहेबाज म.फारूख मणियार तर पंजाबसाठी विजय नामदेव अंजान याची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत दहा हजार युवक सहभागी झाले होते. पैकी अंतिम टप्प्यात बारा स्पर्धकांसाठी ऑन लाईन मतदान प्रक्रिया घेण्यात आली होती. मणियार यास सर्वाधिक एक लाखाहून अधिक मते प्राप्त झाली आहेत.

बुधवारी (दि. २५) मणियार  छत्तीसगडचा एक दिवसाचा  मुख्यमंत्री असणार आहे. तर विजय अंजान हा गुरुवारी (दि. २६) पंजाब राज्याचा मुख्यमंत्री असणार आहे. दोन्ही युवक हे अंबाजोगाई येथील असून दोघेही योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या योगेश्वरी नूतन विद्यालय व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. शहेबाज  मणियार याने इलेक्ट्रीक इंजिनियरींग पदवी प्राप्त केली आहे. सद्ध्या तो मुंबई येथे यु.पी.एस.सी.ची तयारी करतो आहे. अंजान हा अंबाजोगाई  येथील योगेश्वरी सायन्स काॅलेजमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतो आहे. दोघांनी मिळवलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल संस्था अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे, सचिव गणपत व्यास गुरूजी, प्रा.माणिकराव लोमटे, मुख्याध्यापिका के.टी.व्यास, .ए.डब्ल्यू. साळुंके सर्व अंबाजोगाईकरांनी स्वागत केले आहे.

काँग्रेस पक्ष सध्या विविध पातळ्यांवर झगडत आहे. युथ काँग्रेसने तरुण मतदारांकडे मोर्चा वळवला आहे. 'वेक अप महाराष्ट्र' या मोहिमेअंतर्गत अंबाजोगाईच्या शहेबाज म. फारूख व विजय नामदेव अंजान या दोन्ही युवकांना अनुक्रमे छत्तीसगड आणि पंजाब या राज्याचा एक दिवस का होईना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली आहे.

युथ काँग्रेस आयोजित अनोखी स्पर्धा 
येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी युथ काँग्रेसने एक अनोखी स्पर्धा आयोजित केली होती. या अंतर्गत युवकांना एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याची संधी दिली जाणार आहे. 'मैं भी नायक, सीएम फॉर अ डे' असं या मोहिमेचं नाव आहे.यात खरोखर एक दिवसासाठी मुख्यमंत्री तर बनता येणार नाही, पण एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत मात्र घालवता येणार आहे. काँग्रेसची जिथे जिथे सत्ता आहे, त्या राज्यात मुख्यमंत्र्यांसोबत एक दिवस घालवण्याची संधी काँग्रेस युवकांना देणार आहे.

शेती आणि शिक्षणावर काम करणार 
पंजाब मधील शेती व अन्न या विषयावर सर्वात जास्त काम मी करून त्या मधील काही गोष्टी मी आपल्या महाराष्ट्र राज्यातील  शेतकऱ्यांना कश्या पद्धतीने मदत होईल याचा विचार मी करेल व आपल्या मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या कशा थांबतील यासाठी प्रयत्नशील असणार असल्याचे अंजान यांनी सांगितले. तर शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रास प्राधान्य देईल. प्राथमिक ते पदव्युत्तर शिक्षण मोफत देण्यात यावे. पयाभूत सुविधा चांगल्या असाव्यात. मॉब लिंचिंग सारख्या घटना रोखण्यासाठी  प्रयत्न करेल. आदिवासियांचे विस्थापन झाले आहे त्यांना  मोबदला मिळावा. पर्यावरण संरक्षण आणि नक्षलवादी  क्षेत्रात  पयाभूत सुविधा पोहंचविण्यासाठी प्रयत्न करेल अशी इच्छा मणियार याने व्यक्त केली आहे.

Web Title: 'Me too Nayak'; Ambajogai Youths become Chief Minister of Chhattisgarh and Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.