माजलगाव : तालुक्यातील मोगरा या गावात अडीच हजार घरे असताना, केवळ ६० घरातच मीटर बसविण्यात आली होती. बाकी घरोघरी वीज चोरून वापरण्यात येत होती. यावर महावितरणने उपाययोजना करून संपूर्ण गावात केबल टाकल्यामुळे वीजचोरी पूर्णपणे थांबली आहे.
माजलगाव तालुक्यातील मोगरा गाव गोदावरी नदी पात्राच्या शेजारी वसलेले आहे. यामुळे या भागात पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. यामुळे बागायतीच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे. यामुळे या ठिकाणीही वीज चोरूनच वापरली जात आहे. मोगरा गावची लोकसंख्या ५ हजार १६८ असून, या गावात २ हजार ५१८ उंबरे आहेत. प्रत्येक उंबऱ्यासाठी एक मीटर जरी पकडले, तर या गावात दोन हजार ते बावीसशे मीटर असणे आवश्यक होते.
परंतु या गावात केवळ साठच अधिकृत मीटरची नोंद आहे. बाकीच्या घरोघरी चोरून बेसुमार वीज वापरली जाते. यामुळे या गावातील ट्रांसफार्मर वारंवार खराब होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने महावितरणचे उपविभागीय अभियंता सुहास मिसाळ यांनी या गावात एकाही तारेचा संबंध न ठेवता संपूर्ण गावात केबल जोडण्यात आले. यामुळे सध्या संपूर्ण गाव अंधारात असून, केवळ ६० घरी सुरळीत वीज मिळू लागली आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने व या गावातील घरोघरातील पंखे, कूलर बंद पडल्याने, नागरिकांना अंधारासह उकाडा सहन करण्याची वेळ आली आहे. यामुळे बेसुमार विजेचा वापर करणाऱ्यांना आता विजेचे महत्त्व कळू लागले आहे.
महावितरण कंपनीने मोगरा या गावातून केबल बसविण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे, तालुक्यातील इतर गावांमध्येही वीजचोरीच्या तक्रारी येत असून, या गावातही केबल टाकून चोरी रोखण्यात येणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे.
मोगरा गावात केवळ ६० मीटर बसविण्यात आले होते. बाकीच्या ठिकाणी वीज चोरून वापरली जात होती. यामुळे आम्ही संपूर्ण गावात केबल बसविले आहे. यामुळे आता कुठे या गावातील नागरिक मीटर घेण्यासाठी चकरा मारत आहेत.
- सुहास मिसाळ, उपविभागीय अभियंता, महावितरण कंपनी