लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ओबीसींच्या प्रश्नांवर आ. छगन भूजबळ पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रातील पहिला समता मेळावा बीड येथे होत असून ओबीसींच्या प्रश्नांसह आगामी वाटचालीची सिंहगर्जना ते या मेळाव्यातून करणार असल्याने ओबीसी, बहुजन समाज बंधू- भगिनींसह पुरोगामी विचारधारेवर प्रेम असलेल्या बांधवांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा अ.भा. महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांनी केले आहे.२९ सप्टेंबर १८ राजी दुपारी ४ वाजता बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानात होणार असलेल्या भव्य समता मेळाव्याच्या पूर्वतयारी संदर्भात शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बापूसाहेब भुजबळ हे बोलत होते.यावेळी मेळाव्याचे संयोजक तथा समता परिषदेचे विभागीय आणि बीड जिल्हा अध्यक्ष अॅड. सुभाष राऊत यांनी मेळाव्याची भूमिका विषद करु न आ. छगनराव भुजबळ यांनी राज्यातील पहिला मेळावा बीड येथे नियोजीत केल्याबद्दल आभार व्यक्त केले. ओबीसी समूहाच्या प्रश्नांबाबत रात्रंदिवस झगणाऱ्या ओबीसींचे दैवत आ.भुजबळ यांची आगामी वाटचालीची भूमिका ऐकण्यासाठी बीड जिल्ह्यातील जनतेने लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राऊत यांनी केले.या पत्रकार परिषदेस माळी समाजाचे नेते प्रा. लक्ष्मण गुंजाळ, कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन दळे, परीट समाजाचे विभागीय अध्यक्ष गणेश जगताप, समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन साखरे, शहराध्यक्ष निखील शिंदे, यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
ओबीसींच्या प्रश्नांसाठी मेळावा; छगन भुजबळ करणार मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 1:23 AM