- सतीश जोशी
बीड : बीड जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने ऐनवेळी आपल्या दौऱ्यात बदल करून चारपैकी दोनच गावांच्या शिवारास भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली. त्यांचा हा धावता दौरा जिल्ह्यात चर्चेचा ठरला. केंद्र शासनाच्या पथकाने ६ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यात पाथरी, सोनपेठमार्गे दुपारी सव्वादोनच्या सुमारास प्रवेश केला.
हे पथक माजलगावमार्गे वडवणी तालुक्यातील खडकी, बीड तालुक्यातील कांबी या गावांची पाहणी करणार होते. परंतु, ऐनवेळी या गावांना वगळले. हे पथक मानवत, पाथरीहून पोहनेर, सिरसाळामार्गे रेवली (ता. परळी) येथे जाणार होते. यासाठी बीड जिल्हा पोलीस पथकाची जीप पोहनेरजवळील बीड जिल्ह्याच्या सीमेवर म्हणजे गोदावरी पुलावर उभी होती. परंतु, या पथकाने ऐनवेळी मार्ग बदलला. विटा, सोनपेठमार्गे हे पथक रेवली येथे गेले. पथकाला गाठण्यासाठी पीएसआय योगेश खटके यांच्या गाडीला धावपळ करावी लागली. रेवलीहून माजलगावच्या विश्रामगृहावर त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. परंतु, त्यांनी माजलगाव रद्द करून परळीच्या विश्रामगृहावर भोजन घेतले.
परळी तालुक्यातील रेवली येथील सरपंच मनोहर केदार यांच्या शेतास भेट दिली आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर परळी विश्रमागृहावर जेवण करून सिरसाळा, वडवणी मार्गे रस्त्यावरीलच बीड तालुक्यातील जरूड गावातील केशव काकडे यांच्या शेतास भेट देऊन इथेही जमलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली, त्यांच्या भावना जाणून घेतल्या. जरूडला येईपर्यंत सूर्यास्त झाला होता. संधिप्रकाशातच शेतकऱ्यांशी चर्चा करून बीड गाठले.
दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या पथकात कोण ?दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकात केंद्रीय कृषी विभागाच्या योजना आयोगाचे सहसल्लागार मनीष चौधरी, पेयजल व स्वच्छता विभागाचे एस.सी. शर्मा, ग्रामविकास खात्याचे एस.एन. मिश्रा यांचा समावेश होता. तसेच विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, उपायुक्त विजयकुमार फड, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, कृषी अधीक्षक एम.एल. चपळेंसह महसूल, कृषी व इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग होता.
वैद्यनाथांचे दर्शनया पथकाचा बदललेला दौरा सोबत असणाऱ्या अनेकांना माहीत नव्हता. रेवलीहून हे पथक परळीत आले. वैद्यनाथांच्या दर्शनासाठी या पथकासोबत आलेला अधिकाऱ्यांचा ताफा पाहून मंदिरात भाविकांत कुतूहल निर्माण झाले. या सर्व अधिकाऱ्यांनी दर्शन घेऊन परळीचे विश्रामगृह गाठले.