अंबाजोगाई : केज विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास हा नमिता अक्षय मुंदडा यांच्या माध्यमातूनच साध्य होऊ शकतो. मुंदडा परिवाराकडे सेवेचा व विकासाचा मोठा वारसा आहे, तो अखंडित जोपासा, असे आवाहन आ. सुरेश धस यांनी केले. केज तालुक्यातील उंदरी व अंबाजोगाई तालुक्यातील चनई येथे जाहीर सभेत आ. सुरेश धस बोलत होते.यावेळी भाजपा-शिवसेना-महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा, नंदकिशोर मुंदडा, शेळी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले व मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी धस म्हणाले, कै. डॉ. विमल मुंदडा यांच्या माध्यमातून या मतदारसंघाचा कायापालट झाला. विमलताईंनी मतदारसंघाला विकासाची दिशा दिली. त्यांचा हा वारसा नमिता पुढे चालवत आहेत. त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहा. पालकमंत्री पंकजा मुंडे व डॉ. प्रीतम मुंडे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. युतीतील सर्व घटक पक्ष मुंदडा यांच्या प्रचारासाठी जोमाने काम करीत आहेत. भाजपा सरकारच खरा विकास साध्य करतो. हे गेल्या पाच वर्षात झालेल्या विकासकामांमधून पुढे आले आहे. कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता नमिता मुंदडा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन धस यांनी केले.‘स्व. डॉ. विमल मुंदडा यांची ओळख पुसू दिली जाणार नाही’स्व. डॉ. विमल मुंदडा यांनी केज मतदारसंघाचा परिपूर्ण विकास केला. परंतु त्यांचे नाव व त्यांची ओळख पुसण्याचा प्रयत्न पक्षांतर्गत विरोधकांकडून सातत्याने होत होता. आता पंकजा मुंडे व डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आपण खंबीरपणे विकास साध्य करू, अशी ग्वाही नमिता मुंदडा यांनी व्यक्त केली. सात वर्षे सत्ता नसतांनाही रस्त्यावर उतरून मतदारसंघातील जनतेसाठी संघर्ष केला. जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तत्पर राहिलोत, असेही नमिता मुंदडा म्हणाल्या.
मुंदडांच्या प्रचारार्थ धस यांची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:19 AM