लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्याबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुभाष साळवे, कृषी उपसंचालक सी.डी. पाटील, जिल्हा निबंधक कार्यालयाचे सहायक निबंधक जी.के.परदेशी, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे के.वाय. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.बैठकीमध्ये जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येबाबतची एकूण २२ प्रकरणे ठेवण्यात आली. यात जिल्हास्तरीय समितीने निर्णय घेऊन पात्र ठरविलेल्या प्रकरणातील शेतकरी कुटुंबांना नियमानुसार योग्य तो लाभ देण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच यापुर्वी लाभ मागितलेल्या शेतकरी कुटुंबांना मदत मिळाली का, याचा आढावा देखील यावेळी घेण्यात आला.मदत देण्याच्या संदर्भातील अडचणी जाणून घेतल्या तसेच तात्काळ मागणीप्रमाणे योजना देण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना परळीकर यांनी यावेळी दिल्या. तसेच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने योग्य ती कार्यवाही व उपाययोजना केल्या जात असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
जिल्हास्तरीय समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:13 AM