कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली. शिक्षणाकडे उद्याचे भविष्य म्हणून पाहिले जाते. परंतु लॅाकडाऊनच्या काळात शिक्षण क्षेत्राकडे सर्वात जास्त दुर्लक्ष झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ज्या शैक्षणिक संस्थांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून ॲानलाईन शिक्षण दिले त्यांना शासनाने प्रोत्साहन देणे अपेक्षित होते. पण आतापर्यंत या ॲानलाईनच्या काळात विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात सामील करणाऱ्या शिक्षकांचा व शैक्षणिक संस्थांचा विचार कोणीच केलेला नाही. या पार्श्वभूमीवर गेवराई तालुक्यातील इंग्लिश स्कूलच्या संस्थाचालकांची १२ जून रोजी बैठक झाली. यावेळी सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून प्रत्येक संस्थाचालकांनी काटेकोर नियोजन करून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे असे स्पष्ट मत प्रा. आर. के. चाळक यांनी मांडले. प्रत्येक विद्यार्थ्यांनी व पालकांनी या काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करून आपले भविष्य उज्ज्वल करावे यासाठी तालुक्यांतील इंग्लिश स्कूलचे संस्थाचालक कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.
या प्रसंगी प्रा. आर. के. चाळक , सुमित बोर्डे , डॉ. बी. आर. मोटे , डॉ. चव्हाण, विजय राठोड, श्याम चाळक, विकास कोकाटे, धायगुडे, महेश चेके, बने, विलास सागडे, मोहन ठाकर, पठाण , शर्मा आदींची उपस्थिती होती.