केज (जि. बीड) : तालुक्यातील कोरडेवाडी येथील मनोरुग्ण महिला दहा वर्षांपूर्वी मुलासह गायब झाली होती. त्यानंतर तिच्या दोन्ही मुलींचा सांभाळ युवाग्राम विकास संस्थेने केला. गायब झालेली महिला नागपूर येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात असल्याचे समजताच युवाग्राम संस्थेने ताटातूट झालेल्या मायलेकींची भेट घडवून आणली.
कोरडेवाडी येथील किष्किंदा परसराम वरपे (वय ५७) ही मनोरुग्ण महिला २०१३ साली दोन वर्षांच्या मुलासह २ मुलींना घेऊन गावात राहत होती. गावात मिळेल ते अन्न खाऊन दिवस काढत होते. आई मनोरुग्ण असल्यामुळे मुलांची वाताहत हाेत असल्याचे शिक्षिका हिराबाई शेळके यांच्या लक्षात आले. त्यांनी दोन्ही मुलींना केज येथील युवाग्राम विकास मंडळातील बालगृहात दाखल केले. दरम्यान, मनोरुग्ण महिला मुलाला घेऊन पंढरपूरला गेली. तेथून ती रेल्वेत बसून नागपूरला गेली. तेथील रेल्वे स्टेशनवर ती पाच वर्षे राहिली. त्यानंतर नागपूर न्यायालयाच्या आदेशाने तिला एप्रिल २०१८ मध्ये प्रादेशिक मनोरुग्णालयात भरती करण्यात आले होते. येथे तिच्यावर सहा वर्षे उपचार करण्यात आले. त्यानंतर तिला मुलाची माहिती विचारली असता सांगता आली नाही. परंतु, गावाची माहिती तिने कोरडेवाडी असल्याचे सांगितले.
मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कोरडेवाडीची माहिती घेऊन केज पोलिसांना कळवले. केज पोलिसांनी ही माहिती युवाग्राम बाल सुधारगृहातील कर्मचाऱ्यांना दिली. माहिती मिळताच युवाग्रामच्या टीमने पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांची भेट घेतली. पोलिसांनी त्यांना नागपूर येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाचा पत्ता दिला. प्रादेशिक मनोरुग्णालयात संपर्क साधला असता मनोरुग्ण महिला किष्किंदा वरपे यांच्यावर उपचार झाले असून, कुटुंबीयांनी त्यांना घेऊन जावे, असा निरोप देण्यात आला. १ जानेवारीला युवाग्रामची टीम नागपूर येथील मनोरुग्णालयात पोहोचली. तब्बल दहा वर्षांनंतर अचानक मुलीला समोर पाहून मायलेकींचे डोळे पाणावले व त्यांनी हंबरडा फोडला. किष्किंदा वरपे यांना निरोप देताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश हुमणे, युवाग्रामचे एच. पी. देशमुख, हिराबाई शेळके उपस्थितीत होत्या. मायलेकींची भेट घडवून आणण्यासाठी समाजसेवा अधीक्षक बिडकर, प्रा. कल्पना जगदाळे, प्रकाश काळे, संतोष रेपे, संभाजी वलशे, राहुल देशमुख, सुनीता विभुते, सिंधू जाधव यांनी परिश्रम घेतले.
आष्टीत लावले मुलीचे लग्नयुवाग्रामचे एच. पी. देशमुख यांनी किष्किंदा वरपे यांच्या थोरल्या मुलीचा विवाह २०१७ साली लावून दिला. दुसऱ्या मुलीला दहावीपर्यंत शिकवून गुरुवारी (४ जानेवारी) विवाह लावून दिला. विवाह सोहळ्यासाठी युवाग्राम विकास मंडळ, प्रा. कल्पना जगदाळे, बी. के. कापरे, प्रकाश काळे, सुनीता विभुते, संतोष रेपे, राहुल देशमुख, संभाजी वलशे, हिराबाई शेळके, द्वारकाबाई थोरात यांनी परिश्रम घेतले.