बीड : परळी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसी उभारणीच्या हालचालींनी प्रशासकीय पातळीवर पुन्हा एकदा वेग घेतला आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा बीडच्या पालकमंञी पंकजा मुंडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. आज मंत्रालयात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत यासंदर्भात एक बैठक पार पडली.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी उपमुख्यमंत्री असतांना परळी तालुक्यातील नाथ्रा येथे एमआयडीसी मंजूर करून घेतली होती. सन १९९७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते याचे भूमिपूजन देखील झाले होते. परंतू त्यावेळी एमआयडीसी उभारणीला प्रचंड विरोध झाल्याने उभारणीची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली होती. आपल्या भागात उद्योगधंदे यावेत आणि हा भाग विकसित व्हावा हे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न होते, परंतु सत्ता नसल्याने ते पुर्ण झाले नव्हते, आता पालकमंञी पंकजा मुंडे यांनी त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पालकमंत्री ना. पंकजा मुंडे यांनी यासंदर्भात चर्चा करण्यासाठी पुढाकार घेऊन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत त्यांच्या मंत्रालयातील दालनात आज संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. एमआयडीसी चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शेट्टी व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सोमवारी करणार जागेची पाहणी पालकमंञी पंकजा मुंडे यांनी या बैठकीत एमआयडीसी उभारणीसाठी आग्रही भूमिका मांडली. उद्योगमंत्री देसाई यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जागेची पाहणी करून पुढील कार्यवाही त्वरेने करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार येत्या सोमवारी म्हणजे ६ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी चे अधिकारी परळी येथे येऊन वरवटी, गाढे पिंपळगांव, वडखेल येथे जागेची व इतर आवश्यक बाबीची पाहणी करणार आहेत. दरम्यान, या बैठकीमुळे एमआयडीसी उभारणीला पुन्हा वेग आल्याने नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.