-----------
लसीकरण करण्याचे आवाहन
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात आरोग्य विभागातर्फे लसीकरण मोहीम जोमाने सुरू आहे. मध्यंतरी दोन दिवस लसीचा साठा कमी झाल्याने लसीकरण मोहीम मंदावली होती. मात्र, आता पुन्हा लसीचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील ४५ वर्षे वयाच्या पुढील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब लोमटे यांनी केले आहे.
------------
लोखंडीच्या कोविड रुग्णालयात रेंजअभावी गैरसोय
अंबाजोगाई : लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित रूग्ण मोठ्या प्रमाणात उपचार घेत आहेत. या परिसरात मोबाईलला रेंज उपलब्ध होत नाही. कोरोनाबाधित रुग्णांना धीर देण्यासाठी व त्यांची विचारपूस करण्यासाठी नातेवाईक व मित्रमंडळी सातत्याने फोन करून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. मात्र, रेंज उपलब्ध नसल्याने त्यांच्याशी संपर्क होत नाही. बहुतांश रुग्ण हे बाहेरगावचे आहेत. या रुग्णांना अनेक अडचणी येतात. त्या अडचणी सोडविण्यासाठी नातेवाईकांना संपर्क साधणे मोठ्या मुश्किलीचे काम झाले आहे. रुग्णही रेंज उपलब्ध व्हावी म्हणून आपला बेड सोडून खिडक्या गाठून रेंज उपलब्ध होते का? यासाठी धडपडत असतात. रुग्णांना दिलासा देण्यासाठी मोबाईल कंपन्यांनी या परिसरात रेंज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश लखेरा यांनी केली आहे.
-------------
नातेवाईकांची धावपळ
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नातेवाईकांचीही धावपळ वाढली आहे. कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध करून देणे. त्यांच्या विविध तपासण्यांचे रिपोर्ट आणणे, त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतर नातेवाईकांना तपासणीसाठी नेणे, अशा विविध कामांसाठी अंबाजोगाई तालुक्यात सध्या नातेवाईकांची धावपळ सुरू आहे.
----------
लाँड्री व्यवसायाचा समावेश अत्यावश्यक सेवेत करावा
अंबाजोगाई : लाँड्री व्यवसाय हा दैनंदिन जीवनात गरजेचा व्यवसाय बनलेला आहे. कपडे धुणे, त्यांना इस्त्री करणे हे काम स्वच्छतेचे आहे. यासाठी लाँड्री व्यवसायाचा समावेश अत्यावश्यक सेवेत करावा. लाँड्री व्यवसायावर अनेकांचा उदरनिर्वाह अचलंबून आहे. हा व्यवसाय बंद झाल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे. रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व सेवाभाव जोपासण्यासाठी लाँड्री व्यवसायाचा समावेश अत्यावश्यक सेवेत करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जाधव यांनी केली आहे.
-----------