अंबाजोगाई : स्वाराती महाविद्यालयात सांस्कृतिक मंडळाकडून ज्येष्ठ नाट्य आणि साहित्यिक समीक्षक नरहर कुरूंदकर यांना त्यांच्या ३९ व्या स्मृतिदिनी आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी आणि सेवानिवृत्त ग्रंथपाल क्रष्णा भोकरे यांच्या ‘आठवणीतील कुरूंदकर गुरूजी’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कुरूंदकरांचे विद्यार्थी प्रेम, मराठी भाषेवरील प्रभुत्व, मराठवाड्याबद्दलचे निस्सीम प्रेम, दलित साहित्याप्रति असलेला आदर तसेच त्यांचा नाट्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र, तर्कशास्त्राचा गाढा अभ्यास याचे दाखले देत, विद्यार्थी जीवनातील अनेक अनुभव भोकरे यांनी सांगत श्रोत्यांना खिळवून ठेवले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या योशिसंचे सचिव गणपत व्यास यांनी कुरूंदकरांचे साहित्य आणि त्यांच्या वक्तृत्व शैलीचे दाखले उपस्थितांना सांगताना अंबाजोगाईशी कुरूंदकरांचा असलेला स्नेह सांगितला. प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ पी. आर. थारकर म्हणाले, विद्यार्थ्यांना कुरूंदकर समजावेत, विद्यार्थ्यांनी त्यांचे साहित्य वाचावे, हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक मंडळाच्या प्रमुख प्रा. संपदा कुलकर्णी यांनी केले होते. आपल्या सूत्रसंचालनात त्यांनी कुरूंदकरांच्या ‘रंगशाळा’ या नाट्यशास्त्र समीक्षेची माहिती उपस्थित श्रोत्यांना दिली. प्रा. ज्ञानेश्वर सोनावणे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रा. सागर कुलकर्णी व विद्यार्थी शशिकांत शिंदे यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच प्रा. रमेश सोनवळकर, डॉ. रूद्देवाड, डॉ. होदलूरकर, डॉ. रऊफ, महेंद्र देशपांडे, पी. सी. गादेकर, प्रा. राजेंद्र देशपांडे, डॉ. बरूरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.