लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पतीने पत्नीचा छळ केल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत; परंतु पतीचा छळ केल्याच्या घटनादेखील समोर आल्या आहेत. बीड जिल्ह्यात दीड वर्षात तब्बल ३१ तक्रारी भरोसा सेलकडे प्राप्त झाल्या असून, यामध्ये कोरोना काळातील तक्रारींचादेखील समावेश आहे. तर काही प्रकरणांत तडजोडदेखील झाली आहे.
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे शासनाकडे वेळोवेळी लॉकडाऊन तसेच संचारबंदीसारखे निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे अनेक व्यवसाय, उद्योग धंदे बंद आहेत. या परिस्थितीमुळे बहुतांश कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटली असून, त्याचसोबत इतर अडचणींचादेखील सामना करावा लागत आहे. त्यामुळे पर्यायाने अनेक जण घरी बसून होते. या काळात काही कुटुंबातील कलह वाढला असून, छोट्या-छोट्या कारणांवरून वाद टोकाला गेला आहे. कौटुंबिक हिंसाचारच्या घटनांमध्येदेखील वाढ झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पती व सासरच्या मंडळीकडून पत्नीचा छळ झाल्याच्या तक्रारींची संख्या जास्त आहे; मात्र त्याच तुलनेत पत्नी व तिच्या माहेरच्यांकडून छळ होत असल्याच्या जवळपास ३१ तक्रारी भरोसा सेल व महिला मुलांकरिता साहाय्य कक्षात प्राप्त झालेल्या आहेत. या प्रकरणांमध्ये तडजोडी होऊन अनेक संसार पुन्हा नव्याने उभा राहतात, तर काही प्रकरणांत गुन्हे दाखल होऊन पती-पत्नी विभक्त होतात.
...........
सहवास वाढला, भांडणेही वाढली
कोरोनामुळे देशात लॉकडाऊन व संचारबंदी करण्यात आली. त्यामुळे सर्वांनाच घरात बसून राहावे लागत होते, त्यामुळे सहवास वाढला असला तरी वादांचे प्रमाणही वाढले आहे. हे वाद विकोपाला जात आहेत.
...
पुरुषांच्या महिलांविरुद्ध तक्रारी
३१
महिलांच्या पुरुषांविरुद्ध दीड वर्षातील तक्रारी
१२४४
भरोसा व महिला मुलांकरिता साहाय्य कक्ष दीड वर्षातील एकूण तक्रारी
१२७६
७६५ जणांचं पुन्हा जमलं
बीड येथील भरोसा सेल तसेच महिला व मुलांकरिता साहाय्य कक्षात दीड वर्षात जवळपास १२७६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. प्रत्येक तक्रारीच्यासंदर्भात दोन्ही विभागात सुनावणी होऊन, त्यासंदर्भातील अडचणी व वाद मिटवण्यासाठी समजून सांगत समुपदेशन करून पुन्हा संसार सुरू करण्यासाठी या विभागांकडून प्रयत्न केला जातो. त्यामध्ये बहुतांश वेळा यशदेखील मिळते. झालेल्या तक्रारींपैकी जवळपास ६० ते ७० टक्के प्रकरणांमध्ये तडजोड होऊन संसार पुन्हा उभे राहतात. यामुळे मुलांची होणारी वाताहात थांबते. दोन्ही कुटुंबातील कटुता कमी होण्यास मदत होते. यामागे दोन्ही कक्षातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असतो.
....
भांडणाची ही काय कारणं झाली
पती किंवा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणे, फोनचा अतिवापर करणे, घरातील कामे येत नाहीत, पतीला व्यवस्थित न बोलणे, सतत माहेरी जाणे, सासू-सासऱ्यांसोबत वाद घालणे, विनाकारण भांडण करणे यांसह अनेक छोट्या-छोट्या कारणांमुळे कुटुंब विभक्त होण्याची कारणे आहेत.
...
संसार जुळवण्यासाठी प्रयत्न
आमच्याकडे घरगुती वादातून विभक्त होण्यासाठी पती व पत्नी अर्ज करतात. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्यांचेदेखील समुपदेशन केले जाते. त्यामुळे अनेक संसार पुन्हा उभे राहतात, अशी माहिती भरोसा सेलप्रमुख एस. म्हेत्रे व महिला व बालक साहाय्य कक्षाचे गोकुळ धस यांनी दिली.