सोमनाथ खताळ बीड : छोटे कुटुंब, सुखी कुटुंबासाठी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्या जातात; परंतु याची सर्व जबाबदारी महिलांच्याच खांद्यावर असल्याचे समोर आले आहे. राज्यात ९७ टक्के महिला कुटुंब कल्याणच्या शस्त्रक्रिया करीत असून, नसबंदी करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण अवघे अडीच टक्के आहे. कोरोना काळात अशा शस्त्रक्रिया निम्म्याने घटल्या आहेत.
माता व बालमृत्यू थांबावेत, यासाठी आरोग्य विभागाने कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविणे सुरू केले. महिलांची शस्त्रक्रिया तर पुरुषांची नसबंदी करून छोटे कुटुंब संकल्पना अमलात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे; परंतु यासाठी पुरुष नकारात्मक असल्याचे समोर आले आहे. मागील पाच वर्षांतील राज्याची माहिती घेतली असता, केवळ अडीच टक्के पुरुषांनी नसबंदी केली आहे. तर महिलांचा आकडा हा ९७ टक्के एवढा आहे. मागील आठवड्यात पुण्यात संचालकांच्या उपस्थितीत राज्यातील माता व बालसंगोपन अधिकाऱ्यांसह बाह्य निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. यात हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला होता.
शस्त्रक्रियांची आकडेवारी अशीराज्यात २०१७-१८ साली ४ लाख २१ हजार ५०९ कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झाल्या होत्या. तर कोरोना काळात म्हणजेच २०१९-२० मध्ये ३ लाख ७१ हजार व २०२०-२१ मध्ये २ लाख ११ हजार ७७३ शस्त्रक्रिया झाल्या. २०२१-२२ मध्ये २ लाख ८० हजार ७७९ एवढ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
गर्भनिरोधक गोळ्यांचाही वापरजनजागृती आणि उपाययोजनांमुळे गर्भनिरोधक गोळ्यांचा वापरही वाढला आहे. पाच वर्षांपूर्वी २ लाख ४२ हजार लोकांनी ही गोळी खाल्ली होती. कोरोनात आकडा २ लाख २७ हजारावर गेला होता; परंतु गतवर्षी त्यात वाढ होऊन २ लाख ४६ हजार इतक्यावर तो पोहोचला आहे.
निरोधच्या वापरातही घट २०१७-१८ साली ३ लाख ६ हजार १८७ लोकांनी निरोध वापरले होते. कोरोना काळात २०२०-२१ मध्ये २ लाख २९ हजार ९३२ एवढी संख्या होती. आता पुन्हा संख्या वाढू लागली आहे. गतवर्षात पावणे तीन लाख लोकांनी निरोधचा वापर केला आहे.