लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : येथील केसापुरी कॅम्पजवळ असलेल्या व्यंकटेश लॉन्स येथील शासकीय कोविड केअर सेंटरवर रूग्णांना लॉन मालकाकडून मानसिक त्रास देण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. याठिकाणी बाहेर बसलेल्या रूग्णांना आत येता येऊ नये म्हणून कुलूप लावण्यात आले व त्यानंतर रात्री ११ वाजता या ठिकाणचे सर्व दिवे बंद केल्याने रूग्णांना रात्र अंधारात काढावी लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र, असे असतानाही प्रशासनाकडून या लाॅनमालकाला अभय दिले जात असल्याचा आरोप रूग्ण करत आहेत.
माजलगाव शहर व तालुक्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शासकीय कोविड केअर सेंटर आता चार ठिकाणी सुरू केले आहे. यापैकी व्यंकटेश लॉन्स येथील कोविड केअर सेंटरवर १०७ रुग्णांना ठेवण्यात आले आहे. यापैकी ९० रूग्णांना खुल्या जागेत ठेवण्यात आले आहे. त्यांना याठिकाणी केवळ दोन शौचालय व दोनच बाथरूम आहेत. मागील आठ दिवसांपासून येथील नगरपालिकेने स्वच्छताही केलेली नसल्याने याठिकाणी दुर्गंधी पसरली आहे.
याठिकाणी असलेल्या रुग्णांना या लॉन चालकाकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप येथील रुग्णांकडून होत आहे. मंगळवारी दुपारी येथील काही रुग्ण बाहेर खुल्या हवेत बसलेले असताना येथील वॉचमन आतमधील गेटला कुलूप लावून बाहेर निघून गेला. खूप वेळ वाट पाहूनही तो न आल्याने येथे असलेल्या रुग्णांनी चक्क कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर येथील वॉचमनने मंगळवारी रात्री ११ वाजता रुग्ण झोपलेल्या ठिकाणचे दिवेच बंद केल्याने रुग्णांना रात्र अंधारात काढावी लागली.
इच्छा नसताना लॉन कोविड केअर सेंटरसाठी द्यावे लागल्याने येथे असलेल्या रुग्णांना मुद्दाम त्रास देण्याच्या उद्देशाने या लॉन मालकाकडून विविध फंडे वापरले जात असल्याचा आरोप येथील रुग्णांनी केला आहे. याचा व्हिडीओदेखील रुग्णांनी तयार करून व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ बाहेर येऊनही व रुग्णांना त्रास देऊनही संबंधित लॉन मालकावर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा विचारणादेखील करण्यात आली नसल्याने रुग्णांमध्ये प्रशासनाविरुद्ध रोष निर्माण झाला आहे.
संबंधित लॉन मालकाकडून कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या रूग्णांना अशाप्रकारे त्रास देणे योग्य नाही. याबाबत तेथे जावून असा प्रकार झाला आहे का? याची माहिती घेतल्यानंतर संबंधित जागा मालकावर कारवाई करण्यात येईल.
- वैशाली पाटील, तहसीलदार, माजलगाव.
===Photopath===
210421\purusttam karva_img-20210421-wa0039_14.jpg~210421\purusttam karva_img-20210421-wa0038_14.jpg