अंबाजोगाई : २६ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन जाहीर केले होते. त्यानंतर ५ तारखेला सर्व बाजारपेठ नेहमीप्रमाणे खुल्या झाल्या. राज्यशासनाने कडक निर्बंध लावल्याने जिल्हा प्रशासनाने तीच री ओढली. त्यामुळे काय उघडे राहणार आणि काय बंद याचा उलगडा न झाल्याने मंगळवारी सकाळी सर्व बाजारपेठ नेहमीप्रमाणे उघडली. परंतु १० वाजेनंतर पोलीस व महसूल यंत्रणा रस्त्यावर उतरल्यानंतर बाजारपेठा बंद करण्यात आल्या.
बाजारपेठा बंद झाल्या तरी वाहनांची गर्दी रोडवर मोठ्या प्रमाणावर दिसून आली. प्रशांत नगर भागातील रस्ता तर रहदारीने जाम झाला होता. कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढू लागल्याने शासनाच्या कडक निर्बंधाची अंमलबजावणी होताना दिसून आली नाही.
तीन तास दुकाने उघडे ठेवण्याचा व्यापाऱ्यांनी स्वतःहून घेतला निर्णय
शासनाच्या कडक निर्बंधातून शेतीविषयक व्यवसायांना सूट देण्यात आली असली तरी मोंढा भागातील कृषी आधारित मशिनरी व्यावसायिकांनी स्वतःहून उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांची भेट घेतली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शेतीविषय दुकाने १० ते १ दरम्यान सुरु ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतल्याचे उपजिल्हाधिकारी झाडके यांनी सांगितले. असाच निर्णय इतर व्यापाऱ्यांनी घेतला तर कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येऊ शकतो असे आरोग्य यंत्रणेला वाटते.मशिनरी संघटनेच्या वतीने व्यापारी धनराज सोळंकी व इतरांनी पुढाकार घेतला.