बीड : बीड शहरचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे आणि वाहतूक शाखेचे राजीव तळेकर यांच्या विरोधात व्यापारी, सर्वसामान्यांच्या तक्रारी वाढल्या होत्या. याप्रकरणी आ. संदीप क्षीरसागर आक्रमक झाले होते. याप्रश्नी आ. क्षीरसागर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या पत्राची दखल घेऊन बीड शहरचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, वाहतूक शाखेचे राजीव तळेकर यांची औरंगाबादला बदली करण्यात आली आहे.
बीडमध्ये 13 मे रोजी सकाळी जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशानुसार व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडलेली असतांना बीड शहर पोलीस ठाण्याचे पो.नि.वासुदेव मोरे व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची खातर जमा न करता व्यापाऱ्यांना व ग्राहकांना मारहाण करून जबरदस्तीने बीड शहर पोलीस ठाण्यात नेले होते. यानंतर बीड शहरातील व्यापारी बांधवांनी आक्रमक भूमिका घेत विनाकारण त्रास देणाऱ्या पो.नि.वासुदेव मोरे, वाहतूक शाखेचे पो. नि तळेकर यांना निलंबित करावे अशी मागणी करून बेमुदत बंदची हाक दिली होती.
या प्रश्नी आ.संदिप क्षीरसागर यांनी व्यापाऱ्यांना आपला पाठिंबा असल्याचे सांगत विनाकारण व्यापाऱ्यांना, ग्राहकांना, नागरिकांना विनाकारण त्रास देवू नये, अशी कडक भूमिका घेतली होती. आ. क्षीरसागर यांच्या आक्रमक भूमिकेचा चांगलाच दणका बसला आहे. येथील वाहतूक शाखेचा अतिरिक्त पदभार पोनि पाटील ( पेठ बिड पोलीस ठाणे ) यांच्याकडे तर बीड शहरचा पदभार - पोनि सुनील बिर्ला, (पोलीस ठाणे शिवाजीनगर) यांच्याकडे देण्यात आला आहे. या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांची औरंगाबाद येथें बदली केल्याने आ. संदीप क्षीरसागर, पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे व जिल्हा प्रशासनाचे बीड शहरातील व्यापारी संघटनानी आभार मानले आहेत.