दिंद्रुड : धारूर तालुक्यातील कांदेवाडी येथील फौजी गोपीनाथ कांदे मंगळवारी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर गावकऱ्यांनी त्यांची घोड्यावर वाजतगाजत मिरवणूक काढली. गावकऱ्यांनी केलेल्या स्वागताने फौजी गोपीनाथ कांदे भारावून गेले होते.
गोपीनाथ कांदे १९९९ ला भारतीय सैन्यात दाखल झाले होते. शिपाई पदापासून हवालदार पदावर त्यांनी २४ वर्षे सेवा बजावली. कारगिल, बेळगाव, देहरादून, साउथ आफ्रिकेच्या शांती सेनेत, लेह-लडाख, अरुणाचल प्रदेश, आसाम, राजस्थान, केरळ व जम्मू-काश्मीरमध्येही त्यांनी सेवा बजावली. जम्मू-काश्मीर येथे दहशतवादी हल्ला झाला होता. चकमकीदरम्यान दहशतवाद्याची बंदूक डोक्यावर असताना बंदुकीतील गोळ्या संपल्याने आपण थोडक्यात बचावल्याचे कांदे यांनी सांगितले.
भारतीय सैन्य दलातील सेवा ही अतिशय जोखमीची, पण देशाभिमान जागवणारी असल्याचे त्यांनी सांगितले. देशाची सेवा करण्याची संधी मिळाल्याबाबत गर्व असल्याने ते म्हणाले. भविष्यात तरुणांनी भारतीय सैन्य दलात भरती होण्याचा सल्ला दिला. दरम्यान, बेळगाव येथील सैनिकी प्रशिक्षण केंद्रात त्यांनी सेवानिवृत्ती स्वीकारली. कांदे यांच्या आगमनानिमित्त ग्रामस्थांनी घोड्यावरून मिरवणूक काढली. गावात ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केले. दारासमोर सडा-रांगोळी काढत गावात सजावट करण्यात आली होती.
अकरा पदके प्राप्तगोपीनाथ कांदे यांना सर्वोच्च कामगिरीबाबत अकरा पदके प्राप्त झाली आहेत. बेळगाव येथे सेवानिवृत्तीच्या काळात नवनियुक्त फौजींना प्रशिक्षण देण्याचे काम त्यांनी केले.