बीड : कोरोनाची लाट ओसरत असल्याने व अनलॉकमुळे यंदा गणेशोत्सवासह अन्य सणांचा उत्साह दिसून येत आहे. मात्र, सर्वच क्षेत्रांत महागाईने कळस गाठला असून, त्यात मिठाईचे दरही वाढले आहेत. दूध, साखर, मैदा, बेसन, गॅस, तेल-तुपाच्या दरात वाढ झाल्याने मिठाईच्या दरातही १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच काळात नेमका गणेशोत्सव, गौरी-गणपतीचा सण आल्याने मिठाईचे दर वाढल्याने काहींचा संभ्रम झाला असला तरी बहुतांश ग्राहकांनी मात्र सगळंच महाग झालंय, महागाईला कसे रोखणार म्हणत जादा पैसे मोजून मिठाईचा आनंद घेतला.
मागील आठ महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या दराचा आलेख वाढताच राहिल्याने सर्वसामान्यांना आर्थिकबाबतीत कसरत करावी लागत आहे. किराणा साहित्याचे दर वाढल्याचा परिणाम खाद्यपदार्थ बनविणारे आणि ते विकणाऱ्यांवरही झाला आहे. कोरोनानंतर मनुष्यबळाचा अभाव जाणवत आहे. कसब असणारे व चांगले काम करणाऱ्या कामगारांची टंचाई असल्याने कुशल कामगारांचा मजुरीदर प्रतिदिन दीडशे ते दोनशे रूपयांनी वाढला आहे.
१) मिठाईचे दर (प्रतिकिलो)
मिठाई सध्याचा दर गणेशोत्सवाआधी
मलाई पेढा ३६० ३२०
कलाकंद ४०० ३६०
मिल्क केक ४०० ३६०
मोतीचूर २४० २००
काजुकतली ९०० ८००
बालुशाही २४० २००
रसमलाई ३६० ३४०
२) का वाढले दर ?
कच्च्या मालाचे भाव वाढले की सर्वच खर्चात वाढ होते. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो. डिझेल, वाहतूक, दूध, मजूर, इंधन, साखर, बेसनाचे दर वधारल्याने मिठाई व फरसाणच्या दरात १० ते १५ टक्के वाढ झाली. ही वाढ जुलै-ऑगस्टपासूनच झाली असून, सणामुळे झालेली नाही. - भरत जैन, स्वीट होम चालक, बीड.
--------------
खाद्यतेल, साखर, मैदा, बेसन दुधाच्या दरात मागील काही महिन्यांत वाढ झाली आहे. गॅस सिलिंडर दीड हजारांच्या पुढे आहे. मजुरांचे दरदेखील वाढले आहेत. त्यामुळे व्यवसाय करताना आर्थिक ताण वाढत आहे. नाईलाजाने दहा टक्के दरवाढ करावी लागली आहे. - किशोर शर्मा, स्वीट होम चालक
३) भेसळीकडे लक्ष असू द्या
ग्राहकांनी बेस्ट बिफोर पाहून मिठाई खरेदी करावी व सेवन करावे. जेथून मिठाई खरेदी केली असेल त्यांच्याकडे अन्न परवाना असल्याची खात्री करावी. स्वत: निरीक्षण करून भेसळ नसल्याची खात्री करावी. शक्यतो परवानाधारक अथवा नोंदणीधारकांकडूनच मिठाई खाद्यपदार्थ घ्यावेत.
४) ग्राहक म्हणतात
कच्च्या मालाचे भाव वाढल्याने मिठाईचे भाव वाढणारच, हे मान्य आहे. पण भाववाढीच्या नावाखाली खाद्यपदार्थांच्या दर्जात तडजोड करू नये. पैसे जास्त घ्यावेत पण चांगला दर्जा टिकवावा. - राजेश देशमुख, ग्राहक, बीड.
----------------
मी गेल्या तीस वर्षांपासून विश्वास व खात्री असणाऱ्या ठराविक दुकानांमधून मिठाई खरेदी करतो. कच्च्या मालाची दरवाढ किंवा घसरणीनुसार मिठाईचे दर असल्याचे अनुभवले आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीची मिठाई खरेदी करायची तर पैसे थोडे जास्त लागणारच. - गणेश राऊत, ग्राहक, बीड.
५) दरांवर नियंत्रण कोणाचे?
स्वीट होमवर अन्न सुरक्षा नियमांचे पालन केले जाते का तसेच इतर तपासणी व कार्यवाहीचे अधिकार आम्हाला आहेत. दरवाढीचा विषय आमच्या अखत्यारित येत नसून, वजन, मापे नियंत्रण विभागाचा तो विषय आहे. आमच्या विभागाकडे मनुष्यबळ कमी असले तरी नियमित तपासणी करून योग्य ती कार्यवाही केली जाते.
- सय्यद इम्रान हाश्मी, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, बीड.
---------