पाटोदा ( बीड ), दि. 3 : जलसंधारणाच्या कामांवर सध्या कोट्यवधी रुपाय खर्च केला जात आहे. मात्र, गतवर्षी अतिवृष्टीमुळे फुटलेल्या तलावांच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे चांगला पाऊस झाल्यानंतरही तलावांमधे जलसाठा होऊ शकला नाही व जमा झालेले लाखो लिटर पाणी वाहून गेले.
पाटोदा तालुक्यात गतवर्षी पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात अतिवृष्टी झाली. यात विवध ठिकाणची आठ लहान - मोठे तलाव फुटले. जमिनी, रस्ते वाहून गेल्या अब्जावाधीच्या मालमत्तेचे नुकसान झाले. मात्र, वर्ष उलटून गेले तरी फुटलेल्या तलावांची दुरुस्ती करण्यात आली नाही. यामुळे या काळात झालेल्या पावसाचे पाणी तलावात साठू शकले नाही. दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण झाली असती तर तलावांमध्ये पाणीसाठे झाले असते. याचा उपयोग शेकडो एकर जमीनीवरील पिकांना व शेतक-यांना झाला असता.
सध्या सर्वत्र जलसंधारणाची मोठ्या प्रमाणावर कामे सुरु आहेत. यावर कोट्यवधी रुपयांचा खर्चही होत आहे. परंतु. दुरुस्तीकडे कोणाचेच लक्ष्य नाही. विशेष म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानची दुरुस्ती किंवा पुनर्निर्माणासाठी केंद्र सरकार स्वतंत्र निधी देते. यात केवळ प्रशासकीय उदासीनता आणि तालुक्यात प्रभावी नेतृत्वाच्या अभावामुळे दुरुस्तीच्या कामाकडे कोणी गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे आता दुरुस्त्या कधी होणार याबाबत साशंकताच आहे .