बीड-
दसऱ्याच्या मुहूर्तावर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बीडमध्ये भगवान गडावरील कार्यक्रमात जोरदार भाषण केलं. पंकजांनी आपल्या भाषणात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरही नाव न घेता टीका केली. ''बीड जिल्ह्याची अवस्था आज काय आहे? यांनी आपलं मंत्रिपद भाड्यानं दिलं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात यांना काही बोलता येत नाही", असा टोला पंकजा यांनी लगावला होता. त्यावर धनंजय मुंडे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. "पंकजा मुंडे या स्वत: पाच वर्ष बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. त्यामुळे मंत्रिपद भाड्यानं देण्याचे आरोप करणं म्हणजे एक केविलवाणा प्रकार आहे. जनतेला माहिती आहे, दोन वर्षात एवढी संकटं असताना मंत्री म्हणून किंवा पालकमंत्री म्हणून काय काम करतोय. त्यामुळे त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा प्रश्न आहे, असा पलटवार धनंजय मुंडे यांनी केला आहे.
"पंकजा मुंडे यांनी भाषणात एक गोष्ट कबुल केली की त्या मंत्रिपड भाड्यानं दिलंय हे बोलल्या. पण त्या मंत्री असताना बीड जिल्ह्यातील आणि त्या सभेला उपस्थित असलेल्या असंख्य ऊसतोड मजुरांना त्यांना न्याय देता आला नाही. त्यावेळेस त्यांचं मंत्रिपद त्यांनी कुणाला भाड्यानं दिलं होतं का?", असा खोचक सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.
पंकजा मुंडे नेमक्या कोणत्या बाजूनं?धनंजय मुंडे यांनी यावेळी पंकजांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्हं उपस्थित केलं. "पंकजा नेमक्या कोणत्या बाजूने आहेत? त्या सत्ता पक्षात आहेत की विरोधी पक्षात आहेत? कुठलीतरी एक भूमिका त्यांनी घ्यावी. विरोधीपक्ष हा त्यांचाच पक्ष आहे. त्यांचाच पक्ष सरकार पाडायचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्रात सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. एकीकडे सरकार पाडण्यासाठी त्यांच्या पक्षानं वाट्टेल ते करायचं. दुसरीकडे सरकार पडणार आहे की नाही या गोंधळात राहू नये, असं त्यांनी म्हणायचं. त्यांनी आता स्वत: गोंधळात राहू नये. आज इतक्या अभूतपूर्व संकटाच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?, असा घणाघात धनंजय मुंडे यांनी केला आहे.