बीड : राज्य सरकारमधील मंत्री रोज सकाळी आपले विचार मांडतात, परंतु लोकांच्या प्रश्नांवर भाष्य करण्याऐवजी ते केवळ एका व्यक्तीवर बोलतात, हे दुर्दैवी आहे अशी खोचक टीका करत खासदार प्रीतम मुंडे ( MP Pritam Munde ) यांनी आज राष्ट्रवादींच्या मंत्र्यांवर अप्रत्यक्ष निशाना साधला. तसेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी सरकारने तातडीने कारवाई करावी, अध्यादेश काढून आतापुरता दिलासा मिळाला आहे. मात्र येणाऱ्या काळातील निवडणुकांचे काय ? (MP Pritam Munde criticizes State Government ) असा सवाल खा. मुंडे यांनी केला.
खा. प्रीतम मुंडे यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत आज राज्य सरकारवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, भाजपने केलेल्या चक्काजाम आंदोलनामुळे राज्य सरकारचे डोळे उघडले आणि त्यांनी ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणासाठी अध्यादेश काढला. इम्पिरिअल डेटा मिळणे कठीण काम नाही. परंतु, राज्य सरकारने तारीख पे तारीख केले, यामुळे ओबीसींवर अन्याय झाला. याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा. अध्यादेश आताच्या निवडणुकांसाठी लागू असला तरी येत्या काळात पालिका, जिल्हा परिषद अशा संपूर्ण राज्यात निवडणुका आहेत येणाऱ्या काळात आणखी निवडणुका आहेत. सरकारने यावर तातडीने कारवाई करून न्याय मिळवून द्यावा. आज समाजातील कोणताही घटक राज्य सरकारच्या कामगिरीवर खुश नाही, अशी जोरदार टीकाही खा. मुंडे यांनी यावेळी केले. तसेच सर्वसामान्य नागरिकांनी सरकारच्या कामगिरीवर लक्ष ठेवून येत्या काळात त्यांना त्यांची जागा दाखवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राज्याकडून रेल्वेसाठी मदत नाहीबीडच्या रेल्वेसाठी राज्य आणि केंद्र सरकार हे दोघे मदत करणार होते. मात्र, राज्य सरकारकडून मदत मिळत नाही. आतापर्यंत केंद्राने भरपूर मदत केली, राज्याने केवळ १९ कोटी दिले. राज्य सरकारने निधी द्यावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. जर निधी उपलब्ध झाला तर २०२४ पर्यंत रेल्वेचे काम पूर्ण होईल असेही त्या म्हणाल्या.
विधानपरिषद निवडणुकीत डावलले नाही राज्य विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत. यात पंकजा मुंडे यांना पुन्हा डावले गेले का ? असे खा. प्रीतम मुंडे यांना विचारण्यात आले. यावर या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडणूक येणाऱ्या विधानपरिषद आमदारांच्या आहेत. यामुळे पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भातील जागेसाठी मराठवाड्यातील पंकजा मुंडे यांना कसे उभे राहता येणार, असे स्पष्टीकरण खा. मुंडे यांनी दिले.