बीड: हायप्रोफाईल राहणीमानाचा प्रभाव, कुसंगत यामुळे शिक्षण घेण्याच्या वयात मुले भरकटण्याची शक्यता असते. कळत - नकळत हातून मोठा अपराध होऊ शकतो. असाच एक प्रकार बीडमध्ये ५ सप्टेंबर रोजी उघडकीस आला अन् पोलिसांसह नातेवाईकही चक्रावून गेले. शिक्षणासाठी मामाकडे राहायला आलेल्या भाच्याने मित्रांच्या मदतीने तब्बल ५० तोळे दागिने चोरले. त्यानंतर ते मित्रांमध्ये वाटून घेत हौसमौज करण्यासाठी थेट मुंबई गाठली. विशेष म्हणजे सातही जण अल्पवयीन असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, बीड शहरातील पंचशीलनगरात एका व्यक्तीचे स्वत:चे घर आहे. त्यांचा भाजीपाला विक्रीचा पुण्यात व्यवसाय आहे. त्यामुळे ते कुटुंबासह पुण्यात राहतात. इकडे घरातील काही खोल्या किरायाने दिलेल्या असून, उर्वरित त्यांनी स्वत:च्या वापरासाठी ठेवलेल्या आहेत. त्यातील कपाटात ५० तोळे सोन्याचे दागिने ठेवलेले होते. त्यांचा भाचा बारावीत शिकतो. खासगी शिकवणी लावून अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून त्यास मामाने स्वत:च्या घरात आश्रय दिला. घरात कोणी नसल्याने समवयस्क मित्रांचे त्याच्याकडे येणे-जाणे वाढले. हौसमौज करण्यासाठी पैशांची सगळ्यांनाच चणचण भासायची. यातून घरातील ५० तोळे दागिने चोरुन मुंबई सफर करण्याची भन्नाट कल्पना त्यांना सुचली. ऑगस्टअखेरीस त्यांनी दागिने चोरुन सात जणांत वाटून घेतले. १ सप्टेंबर रोजी भाच्यासह तिघे जण ट्रॅव्हल्सने पुण्याला गेले, तर इतर चौघे बीडमध्येच थांबले. पुण्याला गेलेल्या त्रिकुटाने तेथून मुंबई गाठली व परत पुण्याला येऊन लॉजमध्ये राहिले. १ ते ४ सप्टेंबरदरम्यान त्यांनी आपले शौक पूर्ण केले. एकाचवेळी तिघे गायब झाल्याने नातेवाईकांची चौकशी सुरू केली तेव्हा भाच्याने लिहून ठेवलेली एक चिठ्ठी घरात आढळली. त्यात कोणाला किती तोळे दागिने वाटप केले, याचा तपशिल आढळला. त्यानंतर दागिने चोरीचा प्रकार समाेर आला. ४ सप्टेंबर रोजी नातेवाईकांनी पुणे गाठून तिघांचा शोध घेतला व त्यांना बीडला आणले. ५ सप्टेंबर रोजी पोलिसांनी सातही जणांची चौकशी केली. मात्र, उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.
...
सुरुवातीला बेपत्ताची तक्रार नोंदविण्यास नातेवाईक आले होते. मुले अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा नोंदविणे क्रमप्राप्त होते. त्यानंतर तक्रार न नोंदविता नातेवाईकांनी स्वत:च मुलांना शोधून काढले. आता त्यांनी घरातून ५० तोळे दागिने चोरल्याची बाब समोर आली आहे. मात्र, अजून तक्रार नोंदविलेली नाही. त्यामुळे केवळ मुलांची प्राथमिक चौकशी केली.
- मीना तुपे, उपनिरीक्षक, शिवाजीनगर ठाणे
....
चोरीच्या दागिन्यांवर काढले लोन
यातील एकाने ६५ हजार रुपयांचा मोबाईल घेतला, तर दुसऱ्याने १४ तोळे दागिने एका खासगी फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवून त्यावर लोन घेतले. एकाने १० तोळे दागिने अवघ्या दीड लाखांत एका सराफाला विक्री केल्याची माहिती पोलिसांनी केलेल्या चौकशीत पुढे आल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.
...