ऑनलाइन लोकमत
वडवणी, दि. १० - गुरे चारण्यासाठी शेतात गेलेल्या १२ वर्षीय मुलीवर गावातीलच लक्ष्मण शामराव मुंडे या ५५ वर्षीय नराधमाने बलात्कार केला. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले.
पीडित मुलीचे आई- वडील ऊसतोडीसाठी कर्नाटक राज्यातील बिदर येथे गेले होते. शिक्षणासाठी मुलगी गावी आजोबांकडे राहते. सोमवारी सहावीत शिकणारी पीडित मुलगी आपल्या लहान बहिणीसमवेत गायी चारण्यासाठी वाघदरी शिवारात गेली होती. गावातीलच लक्ष्मण मुंडे याने तिला कापसाच्या शेतात नेऊन तिच्याशी कुकर्म केले. घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर जीवे मारीन अशी धमकी देऊन तेथून पळ काढला. दरम्यान, पीडित मुलीने आपल्या आजोबांना घडला प्रकार सांगितला. त्यानंतर वडवणी ठाण्यात तिच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद झाला.
फौजदार रमेश रूपेकर, पोहेकॉ एन. एन.सोनवणे, एस. एस. गाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर लक्ष्मण मुंडे याच्या राहत्या घरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. पीडित मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने कुटुंबियांना धक्का बसला असून मुलीचे आई- वडील बीडकडे रवाना झाले आहेत.