लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : परळी येथील महिला महाविद्यालयात ११ वीच्या वर्गात शिक्षण घेणाºया अल्पवयीन मुलिची छेड काढणा-या वसंत बब्रुवाहन कराड (रा.इंजेगाव) या आरोपीस सात वर्षाची शिक्षा व पाच हजार रूपये दंडांची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.एस.व्ही.हांडे यांनी ठोठावली. दंडापैकी ३ हजार रूपये पीडित मुलीस देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. छेडछाड प्रकरणात शिक्षा होण्याचे हे पहिलेच प्रकरण असल्याचे सांगण्यात येत आहे.
परळी येथील बसस्थानकात महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीची छेडछाड व पाठलाग, बाललैंगिक कायदा व जिवे मारण्याची धमकी हे दोन गुन्हे परळी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. पीडित मुलगी महाविद्यालय सुटल्यानंतर गावी जात असताना बसस्थानकामध्ये आरोपी वसंत कराड याने पीडितेच्या हाताला धरून त्याच्या मोटारसायकलवर बस म्हणून जबरदस्ती केली. परंतु आरोपीचा हाताला हिसकावून पीडिता बसमध्ये बसून गावी निघाली.
सदरील आरोपीने बसचा पाठलाग करीत पीडितेचे गाव गाठले. गावात गेल्यानंतर वसंतने पीडितेशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी १६ आॅक्टोबर २०१५ रोजी वसंतविरोधात गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास करून सहाय्यक पो.नि.अजित विसपूते यांनी दोषारोपपत्र अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. प्रकरणाची सुनावणी न्या. हांडे यांच्यासमोर झाली. सरकार पक्षाच्यावतीने अॅड.लक्ष्मण फड यांनी पाच साक्षिदार तपासले. साक्षीदारांची व पीडितेची साक्ष यात महत्त्वपूर्ण ठरली. न्या. हांडे यांनी आरोपीला दोषी ठरवून सात वर्षांची शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला.
दुस-या गुन्ह्यात १ सप्टेंबर २०१५ रोजी फिर्यादी ही महिला महाविद्यालयातून गावी जात असताना दुपारी १२ वाजेच्या सुमारास वसंत कराड व त्याचा मित्र बालगुन्हेगार श्रीकांत (नाव बदलले) यांनी पाठलाग करीत वाईट हेतूने छेडछाड केली.
यातील आरोपीने सर्व मुली बसस्थानकात थांबल्या असताना पीडितेच्या हाताला धरून बसस्थानकातून ओढून नेत दुचाकीवर बसून नेण्याचा प्रयत्न केला. हे दोन्ही गुन्हे परळी पोलीस ठाण्यात दाखल होते. यामध्ये साक्षी, पुरावे तपासून शिक्षा सुनावत दंड ठोठावला. या दोन्ही गुन्ह्यांचा निकाल जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. हांडे यांनी सुनावला. सरकार पक्षाच्या वतीने अॅड.अशोक कुलकर्णी यांनी काम पाहिले.