कडा (जि. बीड) : देवस्थान जमीन घोटाळ्यामुळे चर्चेत आलेले बडतर्फ उपजिल्हाधिकारी डॉ. एन. आर. शेळके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. चिंचपूर, रुइनाकोल येथील देवस्थान जमीन घोटाळ्यात त्यांचा सहभाग आढळल्याने त्यांना अटक झाली होती. दरम्यान, देवीनिमगाव येथील वक्फ बोर्डच्या १५ हेक्टर जमीन घोटाळ्यात त्यांच्यावर १ नोव्हेंबर रोजी अंभोरा ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
देवीनिमगाव येथे वक्फ बोर्डाची १५ हेक्टर ९८ आर जमीन सर्वे क्र. १३२ मध्ये आहे. महसुली अभिलेखात नोंदणीकृत वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनीवर वक्फ बोर्डाचे व मशीदचे नाव कमी होऊन अचानक बेकायदेशीरपणे खोटे दस्तावेज तयार करून बनावट सही, शिक्के मारून ख्वाजामियाॅ मकबूल सय्यद याने स्वत:च्या नावे केल्याचे उघड होताच वक्फ बोर्ड अधिकाऱ्यांनी अंभोरा ठाण्यात धाव घेऊन अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या बडतर्फ उपजिल्हाधिकारी एन.आर. शेळके व ख्वाजामियाॅ मकबूल सय्यद याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक रोहित बेंबरे तपास करीत आहेत.
बनावट दस्तावेज तयार करून फसवणूकदेवीनिमगाव येथे वक्फ बोर्डाची मशीदसाठी असलेली जमीन त्यावेळचे आर्चक मोहिद्दीन सय्यद, अकबरअली सय्यद हे वहिती करीत होते; पण ख्वाजामिया सय्यद यांनी खोटे दस्तावेज तयार करून १५ हेक्टर ९८ आर. जमीन बनावट दस्तावेजाआधारे ती खरी असल्याचे भासवून स्वत:च्या नावे केली. वक्फ बोर्डाचे अधिकाऱ्यांनी सोमवारी अंभोरा ठाण्यात धाव घेऊन एन.आर.शेळके बीड, ख्वाजामिया सय्यद रा. देविनिमगाव याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.