बीड : कोरोना संशयित असल्याने स्वॅब घेऊन क्वारंटाईन केले. नंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. रात्रीच्या सुमारास त्यांना सतर्क करण्यासाठी नियंत्रण कक्षातून संपर्क केला. परंतु एका रुग्णाने बीडमध्ये असतानाही आपण पाथर्डीत असल्याचे सांगून घुमवाघुमवी केली. हा प्रकार दोन दिवसांपूर्वी नियंत्रण कक्षात घडला. असे प्रकार वारंवार घडत असून काही रुग्णांकडून सहकार्य मिळत नसल्याने आरोग्य विभागाचा ताण वाढत आहे.
बीड शहरातील कालिकानगर भागातील एका व्यक्तीचा लक्षणे असल्याने स्वॅब घेण्यात आला होता. त्यानंतर त्याला क्वारंटाईन होण्यास सांगितले. दुसºया दिवशी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तात्काळ आरोग्य विभागच्या नियंत्रण कक्षातून त्याला संपर्क करून पॉझिटिव्ह आल्याची माहिती देत घाबरून न जाता काळजी घेण्यास सांगितले. काही तासांनी आपल्याला रुग्णवाहिका येईल व त्यात तुम्ही रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. परंतु या रुग्णाने आपण बीडमध्ये नाहीतच, असा पवित्रा घेतला. मी पाथर्डीत आहे, असे सांगून फोन कट केला. परंतु क्वारंटाईन व्यक्ती बाहेर गेलाच कसा? तसेच त्याच्या बोलण्यात काही प्रमाणात संशय आला. म्हणून वारंवार संपर्क करून त्याच्याकडून माहिती घेतली असता त्याने आपण बीडमध्येच असल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोग्य विभागाने त्याला रुग्णालयात आणले. परंतु असे अनेक प्रकार नियंत्रण कक्षात घडत आहेत. रुग्ण सहकार्य करीत नसल्याने आरोग्य विभागाची तारांबळ होत आहे.
चुकीचा पत्ता अन् अपूर्ण मोबाईल क्रमांककाही रुग्ण चुकीचा व गोंधळात टाकणारा पत्ता नोंदवित आहेत. तसेच मोबाईल क्रमांकही अपूर्ण देतात. अनेकजण तर चुकीचा क्रमांक देतात. रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला शोधणे कसरतीचे ठरते. बीड शहरातील थिगळे गल्ली व इतर भागात असे प्रकार अनेकदा समोर आले आहेत.
आरोग्य विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन स्वॅब दिल्यानंतर अहवाल येईपर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये. क्वारंटाईन राहण्यासह कुटूंबातील इतर सदस्यांना आपला संपर्क होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच नोंदणी करताना अचुक माहिती द्यावी. अहवाल पॉझिटिव्ह आला तरी घाबरून जाऊ नये. तात्काळ रुग्णालयात दाखल होऊन उपचार घ्यावेत. अडचण वाटल्यास संपर्क करावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी केले आहे.