पोलीस हतबल
नातेवाइकांचाही शोध सुरूच, अफवांचे पेव
गेवराई : मी आत्महत्या करत असल्याचे निवेदन करणारा व्हिडिओ व सुसाइड नोट सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर तालुक्यातील कोळगाव येथील सूर्यमंदिर संस्थानचे ह.भ.प. हनुमान महाराज रविवारपासून बेपत्ता झाले असून सोमवारी दुसऱ्या दिवशीदेखील शोध न लागल्याने पोलीस यंत्रणाही हतबल झाली आहे. पोलीस व नातेवाइकांकडून महाराजांचा शोध सुरूच आहे. तर महाराज पंढरपूरच्या दिशेने गेले असावेत, असा अंदाज बांधला जात आहे.
४ फेब्रुवारी रोजी हनुमान महाराज यांच्याविरुद्ध विनयभंग व ॲट्राॅसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर महाराज फरार होते. तसेच त्यांचा मोबाइलदेखील बंद होता. दरम्यान रविवारी या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले.
महाराजांनी सायंकाळी एक व्हिडिओ व सुसाइड नोट सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर खळबळ उडाली. व्हिडिओ व्हायरल झालेले ठिकाण हे मांजरसुंबाजवळील वानगाव फाट्यावर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस व नातेवाइकांनी रविवारी रात्री उशिरापर्यंत महाराजांचा शोध घेतला.