बीड : उसतोडीला जाण्यासाठी महिला गर्भपिशवी काढतात, अशी अफवा राज्यभर पसरविण्यात आली. मात्र, असा कोणताही प्रकार नसून, गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियांची कारणे वेगळीच असल्याचा खुलासा जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत आरोग्य विभागाने शुक्रवारी केला. बीडला बदनाम करण्याचा हा घाट असल्याची प्रतिक्रिया जिल्ह्यातून उमटत आहे.
बीड जिल्ह्यात गर्भपिशवी काढण्याचा बाजार सुरू असल्याची माहिती समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. याची दखल घेत शुक्रवारी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, आरोग्य संचालक डॉ. दयाचंदू यांनी बीड जिल्ह्याचा आढावा घेतला. यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकृष्ण पवार यांनी अहवाल सादर केला.
आरोेग्य विभागाच्या डॉ. आय.व्ही. शिंदे, डॉ. संतोष शहाणे, डॉ. अशोक हुबेकर, डॉ. महेश माने व लिपिक विकास शिंदे या पाच सदस्यांच्या समितीने जिल्ह्यातील सर्व खासगी, सरकारी रुग्णालयांचा अहवाल मागविला. यामध्ये ‘टॉप ५’ रुग्णालयांची यादी काढण्यात आली. या रुग्णालयात सर्वाधिक शस्त्रक्रिया झाल्याचे दिसल्याने त्यांच्याकडून खुलासे मागविण्यात आले आहेत. काही रुग्णालयांची गुरुवारी रात्री उशिरापर्यंत समितीने चौकशी केली.अहवालात समोर आलेले मुद्देगेल्या दोन दिवसांमध्ये जिल्ह्यातील ७ गावांच्या केलेल्या सर्व्हेमध्ये २२३ महिलांची गर्भपिशवी काढल्याचे समोर आले. यात पिशवीतील गाठ, अंगावरील लाल, पांढरे जाणे, पोटदुखी, पिशवीला सूज आदी कारणांमुळे गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया झाली.दोन दिवसांत निर्णय घेणार!यापूर्वी ३५ वर्षांखालील महिलेची शस्त्रक्रिया करावयाची असल्यास जिल्हा शल्य चिकित्सकांना कळविण्याबाबत पत्र काढले होते. त्याचे काहींनी पालनही केले. मात्र, आता यापुढे गर्भपिशवी संदर्भात शस्त्रक्रिया करावयाची असल्यास जिल्हा शल्य चिकित्सकांना कळवावे, असा प्रस्ताव डॉ. अशोक थोरात यांनी बैठकीत मांडला. दोन दिवसांनंतर यावर निर्णय घेणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.